

Pranit More Ghayal: '370 रुपये बिर्याणी' वादामुळे काही महिन्यांपूर्वी स्टँड-अप कॉमेडीपासून दूर गेलेला कॉमेडियन प्रणित मोरे आता पुन्हा रंगमंचावर परतण्यास सज्ज झाला आहे. त्याने आपल्या नव्या स्टँड-अप शोची घोषणा केली असून या शोला 'घायल' (Ghayal) असे नाव दिले आहे. मात्र, शोची घोषणा होताच सोशल मीडियावर त्याची तुलना कॉमेडियन समय रैनाचा शो 'Still Alive' सोबत होऊ लागली आहे.
प्रणित मोरेने बुधवारी इंस्टाग्रामवर 'घायल' शोचे पोस्टर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने लिहिले, "जे घडलं ते मी बदलू शकत नाही, पण त्या अनुभवातून मी कोण होणार, हे मी ठरवू शकतो. 'घायल' ही त्या प्रवासाची कहाणी आहे. या शोची सुरुवात मुंबईपासून होणार आहे." या पोस्टनंतर काही क्षणांतच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले.
प्रणित मोरेच्या नव्या शोची घोषणा होताच अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्याची तुलना समय रैनाच्या 'Still Alive' या कमबॅक शोशी केली. काहींनी प्रणित मोरेवर समय रैनाच्या शोची कॉपी केल्याचा आरोप केला.
एका युजरने लिहिले, "तू समय रैना नाहीस, त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करू नकोस." तर दुसऱ्याने, "वाद निर्माण करून नंतर कमबॅक करण्याचा हा प्रयत्न आहे," अशी टीका केली. काहींनी तर "'घायल'? खरंच?" अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे, अनेक चाहत्यांनी मात्र प्रणित मोरेच्या पुनरागमनाचं स्वागत केलं. "खूप दिवसांनी तुला पुन्हा स्टेजवर पाहायला मिळणार आहे, खूप आनंद झाला," अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. तर दुसऱ्याने, "तू परत आलास याचा खूप आनंद आहे. आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत," असे म्हटले.
जून महिन्यात प्रणित मोरे एका स्टँड-अप शोदरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधत होता. त्यावेळी एका प्रेक्षकाने सांगितले की, डेटवर असताना त्याने चिकन बिर्याणीसाठी सुमारे ₹370 खर्च केले आणि मुलीला घरी सोडल्यानंतर ते पैसे 'वसूल' करण्याची अपेक्षा होती.
या वक्तव्यावर प्रणित मोरे हसला आणि त्याने त्याला "पीक गुरुग्राम कंटेंट" असे संबोधले. या व्हिडिओची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर महिलांविषयीचा दृष्टिकोन, संमती (Consent) आणि स्टँड-अप कॉमेडीची जबाबदारी यावर मोठी चर्चा सुरू झाली.
वाद वाढल्यानंतर प्रणित मोरेने सार्वजनिकरित्या माफी मागितली. त्या प्रसंगी आपण त्या वक्तव्यावर हसायला किंवा त्याला प्रोत्साहन द्यायला नको होतं, अशी कबुली त्याने दिली. या प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली होती.
प्रणित मोरेचा 'घायल' हा नवा स्टँड-अप शो केवळ विनोदापुरता मर्यादित नसून, वादानंतरचा त्याचा वैयक्तिक प्रवास, त्यातून घेतलेले धडे आणि त्या काळातील अनुभव यावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या शोबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असून, त्याचबरोबर सोशल मीडियावर चर्चाही रंगू लागल्या आहेत.