

Pranit More Apology: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेने अखेर '370 रुपयांच्या बिर्याणी' वादावर मौन सोडत सार्वजनिक माफी मागितली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका आणि ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर प्रणितने एक व्हिडिओ शेअर करत आपली चूक मान्य केली आणि मला आणखी एक संधी द्या, असं तो म्हणाला.
प्रणित मोरेने सांगितलं की, या विषयावर तो बऱ्याच दिवसांपासून बोलू इच्छित होता. मात्र त्याचे इन्स्टाग्राम खाते सस्पेंड झाल्यामुळे तो आपली भूमिका मांडू शकला नव्हता. वादग्रस्त 'क्राउड वॉक' व्हिडिओबद्दल बोलताना त्याने कबूल केले की, त्याच्यावर होणारी टीका काही प्रमाणात योग्यच आहे.
"त्या मुलासोबत संवाद सुरू असताना त्याने काही अत्यंत आक्षेपार्ह आणि महिलांचा अपमान करणारी वक्तव्ये केली. पण त्या वेळी प्रेक्षक हसत होते आणि मीही त्या वातावरणात वाहवत गेलो. तिथेच माझा निर्णय चुकला," असे प्रणितने म्हटले.
त्याने पुढे सांगितले की, त्या व्यक्तीला तात्काळ थांबवण्याची किंवा त्याच्या वक्तव्यांचा विरोध करण्याची संधी होती. मात्र तो तसं करू शकला नाही. "मी त्याला एक व्यासपीठ दिलं आणि त्यामुळे हा विषय इतका मोठा झाला. त्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो," असे तो म्हणाला.
या प्रकरणात त्याच्याविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेबाबतही प्रणितने भूमिका स्पष्ट केली. "माझ्याविरोधात सुरू असलेल्या सर्व कायदेशीर कारवाईत मी संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहे," असे त्याने सांगितले.
व्हिडिओच्या शेवटी प्रणित मोरेने लोकांकडे आणखी एक संधी मागितली. "ही घटना माझ्यासाठीही एक मोठा धडा आहे. मी स्वतःवर काम करत आहे. माझ्या कंटेंटमध्येही बदल करण्याचा प्रयत्न करेन. भविष्यात तुम्हाला तो बदल दिसेल. कृपया मला आणखी एक संधी द्या. मी अधिक चांगला माणूस बनून दाखवेन," असे भावनिक आवाहन त्याने केले.
दरम्यान, '370 रुपयांची बिर्याणी' या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणानंतर प्रणित मोरेवर टीकेची झोड उठली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.