

‘नवरी मिळे हिटलरला’नंतर लीला पुन्हा एका नव्या टीव्ही मालिकेत झळकणार असून या मालिकेत वल्लरीला महत्त्वाची भूमिका मिळाली आहे.
Shubh Shravani New tv Serial
अभिनेत्री 'वल्लरी विराज' नवरी मिळे नवरीला नंतर आणखी एका नवीन मालिकेत दिसणार आहे. ती पुन्हा एकदा झी मराठीवर 'शुभ श्रावणी' या मालिकेतून भेटीला येत आहे. नव्या कथानकामुळे आणि दमदार कलाकारांमुळे ही मालिका चर्चेत आली आहे.
वल्लरीची अशी असणार भूमिका
या मालिकेत ती शिक्षणमंत्र्यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. वल्लरी म्हणाली- "माझ्या नवीन मालिकेचं नाव 'शुभ श्रावणी' आहे आणि माझं नाव मालिकेत श्रावणी आहे. ती एका शिक्षणमंत्र्याची मुलगी आहे आणि म्हणून घरी प्रेमळ आपुलकीच वातावरण नसून कडक नियमबद्ध असं वातावरण आहे. श्रावणीला आई नाहीये, तिचे बाबा पण तिच्याशी बोलत नाहीत. श्रावणीकडे पैसे मालमत्ता भरपूर आहे, तिच्या वडिलांनी सुखसोयी म्हणून मोठा बंगला, गाडी, कपडालत्ता, नोकर सुविधा ठेवलेल्या आहेत. पण तिच्याकडे तिच्या बाबांचं प्रेमचं नाही.''
''तिच्या बाबांनी लहानपणापासून तिच्याकडे बघितलं नाही. तिच्याशी ते प्रेमाने का बोलले नाहीत. त्यामुळे श्रावणीचा सारखा प्रयत्न असतो की असं काय करू जेणेकरून बाबा तिच्याकडे लक्ष देतील, ते तिच्याशी बोलतील. कदाचित परीक्षेत चांगले मार्क आणले कि ते तिच्याशी बोलतील म्हणून ती भरपूर अभ्यास करते.''
वल्लरीला कशी मिळाली भूमिका?
चार-पाच महिन्यानंतर मला कॉल आला, कि आम्हाला तुझ्या सोबत परत काम करायचंय, आमची 'शुभ श्रावणी' मालिका येतेय त्यात श्रावणी व्यक्तिरेखेची भूमिका तूच करायचीय अशी आमची इच्छा आहे आणि मला ते ऐकून खूपच आनंद झाला, नकार देण्याचा काही विषयच नव्हता, आणि अजिबात दुसरा तिसरा काहीच विचार न करता मी मालिका स्वीकारली. या भूमिकेसाठी खास तयारी केली आहे. माझी आधीची जी भूमिका होती लीलाची, ती खूपच उत्साही, अल्लड होती. परंतु आता श्रावणी आहे ती समजूतदार, सोज्वळ आणि शांत अशी आहे, मनात कितीही तिला वाईट वाटलं असेल, तिच्या मनात कितीही प्रश्नांचा कल्लोळ असला तरी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन वावर करणारी अशी आहे.
''लोकेश गुप्तेजी माझ्या वडिलांच्या भूमिकेत आहेत, आसावरी जोशी आत्याच्या भूमिकेत आहे. आधीच्या मालिकेतल्या सानिका काशीकर आणि भुमीजा पाटील यादेखील मालिकेत आहेत. मालिकेत मुख्य अभिनेता सुमित पाटील आहे. आमचं प्रोमोचं शूटिंग आणि मालिकेच्या काही सीन्सचं शूटींग हे कोल्हापूरला होतं, आम्ही सगळे कलाकार तिथेच भेटलो.
अजून एक किस्सा सांगायचा झाला तर शूटिंग सुरु झाल्यावर माझ्यासोबत एक अपघातही झाला ज्यात माझ्या खांद्याला दुखापत झाली आणि तुम्ही माझ्या सोशल मीडियावर पहिलेच असेल मी हाताला पट्टी बांधली आहे. प्रेक्षकांना काळजी करण्यासाठी कारण नाही कारण मी रिकव्हरी करत आहे, सेटवर माझी खूप काळजी घेतली जात आहे. मला तुम्हाला भेटण्याची इतकी उत्सुकता लागून राहिली आहे कि मी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून आम्ही सर्व जण काळजी घेत आहोत.
कधी येणार मालिका?
ही मालिका १९ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.