

मुक्ता बर्वे नव्या वर्षात तिच्या चाहत्यांसाठी खास भेट घेऊन येत असून ‘माया’ हा तिचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर सिनेरसिकांमध्ये उत्सुकता वाढली असून मुक्ताच्या दमदार भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mukta Barve cinema maya will release coming soon
मराठी सिनेसृष्टीतील दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ती तिच्या चाहत्यांसाठी खास भेट घेऊन येत असून तिचा आगामी चित्रपट ‘माया’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘माया’ चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुक्ताने यापूर्वी अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेत ती परफेख्ट बसते. त्यामुळे ‘माया’मध्ये ती नेमकी कोणत्या भूमिकेत दिसणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित ‘माया’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचे, डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार यांची निर्मिती आहे. माया हा चित्रपट येत्या २७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटामध्ये नातेसंबंध, मानवी भावना आणि जीवनातील गुंतागुंत यांचा वेध घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. भूमिकांच्या निवडीत मुक्ता बर्वेचं वेगळेपण असतं. आता ‘माया’मध्ये प्रमुख आणि प्रभावी भूमिकेत ती झळकणार आहे.
हे कलाकार दिसणार
रोहिणी हट्टंगडी, डॉ. गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर अशी कलाकारांची फळी चित्रपटात दिसणार आहे.
२४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड
या चित्रपटाची निवड २४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली आहे. दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, ''बिन लग्नाची गोष्टच्या नंतर ‘माया’ हा चित्रपट घेऊन येत आहे. प्रेक्षकांची उत्सुकता आणि पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड होणे या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी अतिशय समाधानकारक आहे.''
निर्माते डॉ. सुनील दातार म्हणाले, ‘माया’ हा चित्रपट आमच्यासाठी खूप खास आहे. दमदार कलाकारांची फळी आणि एक वेगळा आशय असलेला हा चित्रपट आम्ही लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत.''