Monalisa Bagal : मोनालिसा म्हणतेय ‘तू फक्त हो म्हण’

Monalisa Bagal
Monalisa Bagal

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेली मोनालिसा बागल (Monalisa Bagal ) सध्या कोणाच्या तरी प्रेमात पडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. 'तू फक्त हो म्हण' असं ती सांगतेय. ती नेमकी कोणाच्या प्रेमात आहे? ती कोणाला 'हो' म्हणायला सांगतेय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच, त्यासाठी तुम्हाला मोनालिसाचा 'तू फक्त हो म्हण' हा आगामी मराठी चित्रपट पहावा लागेल. (Monalisa Bagal )

एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेला हा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. संगीतमय प्रेमकथा असलेल्या 'तू फक्त हो म्हण' या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती किरण बळीराम चव्हाण आणि डॉ. गणेशकुमार पाटील यांची आहे. नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

मोनालिसा सांगते, संगीतमय प्रेमकथा असल्याने मला हा चित्रपट करायचा होता. ही अशा प्रेमाची कथा आहे जी कदाचित आपल्या अवतीभवती देखील असू शकते. प्रेम हे असतंच तरी त्या प्रेमाला जिंकत आपण ते कसं निभावतो? याची कथा यात पहायला मिळणार आहे. प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही 'तू फक्त हो म्हण' या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

अभिनेत्री मोनालिसा बागलसोबत अभिनेता निखील वैरागर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांच्या जोडीला गणेश देशमुख, तुकाराम बीडकर, पुष्पा चौधरी, सविता हांडे, डॉ. गणेशकुमार पाटील, झोया खान आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनेत्री मानसी नाईक या चित्रपटात पाहुणी कलाकार भूमिकेत दिसणार आहे.

कथा भास्कर डाबेराव तर पटकथा संवाद सचिन जाधव यांची आहे. सुरेखा गावंडे, भास्कर डाबेराव, स्वप्नील जाधव यांनी गीतरचना लिहिल्या आहेत. भास्कर डाबेराव यांचे संगीत तर आदित्य बेडेकर यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले आहे. रंगभूषा समीर कदम तर वेशभूषा अमृता पाटील, अंजली भालेराव, अस्मिता राठोड, अभिजीत ठाकूर यांची आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश पतंगे, पंकज बोरे यांचे आहे. कलादिग्दर्शन गणेश पाटोळे यांचे आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, जय बोरा, पूजा पाटील यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. छायांकन मधुरम सोलंकी तर संकलन आनंद ए. सिंग यांचे आहे. साउंड डिझायनिंगची जबाबदारी दिनेश उचील, शंतनू आकेरकर यांनी सांभाळली आहे. सहनिर्माता एम.जे.एफ. लॉयन प्रकाश मुंधडा तर कार्यकारी निर्माता रवीशंकर शर्मा, राहुल चव्हाण आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news