कामशेत : वेळेत वीजबिल मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त; वंचित बहुजनचा आंदोलनाचा इशारा | पुढारी

कामशेत : वेळेत वीजबिल मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त; वंचित बहुजनचा आंदोलनाचा इशारा

कामशेत : येथील वीजग्राहकांना वेळेवर वीजबिल मिळत नाही. तसेच, अवास्तव बिल मिळत आहे, त्यामुळे ग्राहकांना वेळेवर वीजबिल न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. या वेळी महावितरणचे अधिकारी प्रमोद महाजन यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष कमरुद्दीन शेख, विलास गायकवाड व महेश परमार आदी उपस्थित होते.

ग्राहकांना आर्थिक झळ

कामशेत परिसरातील नागरिकांना वेळेत वीजबिल मिळत नाहीत. महावितरणचे कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता वीजकनेक्शन तोडून टाकतात. त्यानंतर पुन्हा वीजकनेक्शन जोडण्यासाठी 250 रुपये भरावे लागतात, त्यामुळे वीजग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

मीटर रीडिंग न घेताच बिल

गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना उशिरा वीजबिल मिळत आहे. तसेच, मीटरचे रीडिंगसुद्धा वेळेवर घेतले जात नाही. त्यामुळे येणारी वीजबिल हे अंदाजे दिले जात असल्याची तक्रार परिसरातील नागरिक करत आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Back to top button