Marathi Movies 2026: मराठी चित्रपटांना अच्छे दिन; ‘राजा शिवाजी’, ‘देऊळबंद २’ १०० कोटी क्लबमध्ये

‘हाऊसफुल्ल’च्या झळकल्या पाट्या; मराठी अस्मितेशी, मातीशी जोडणारे विषय प्रेक्षकांना भावले
Marathi Movies 2026
Marathi Movies 2026Pudhari
Published on
Updated on

स्वप्निल कुलकर्णी

मुंबई: राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवूनही बॉक्स ऑफिसवर मात्र मराठी चित्रपट चालत नाहीत, अशी तक्रार केली जायची, आजही होते. यावर्षी असे अनेक चित्रपट आले की, त्यांनी कमी बजेटमध्ये जास्त कमाई केली.

यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद २' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान गर्दी खेचत शंभर कोटी क्लबमध्ये दिमाखात ‘एन्ट्री' केली. मराठी अस्मितेशी, मातीशी जोडणारे विषय प्रेक्षकांना भावले. एकूणच गेल्या काही महिन्यांत मराठी चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर डंका असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Marathi Movies 2026
SIR Teacher Duty: एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर; विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम?

मराठी चित्रपटाला चित्रपटगृहामध्ये शो मिळत नसल्याची तक्रार आणि बॉक्स ऑफिसवर हिंदी सिनेमांनाही टक्कर देत मराठी चित्रपटांनी आपली घोडदौड चालूच ठेवली. सर्जनशील आणि संवेदनशील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी 'सैराट'मधून जातीव्यवस्थेवर भाष्य केले.

सैराटची 'माऊथ पब्लिसिटी' जोरात झाली. याचा फायदा चित्रपटाला झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्षे झाली आहेत. मात्र, या चित्रपटाची अजूनही क्रेझ आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८०.९८ कोटींचा गल्ला जमवला होता; तर जगभरातील कमाईचा आकडा ११० कोटी होता.

तेव्हापासून तिकीट बारीवर आणि चित्रपटगृहांमध्येही हाऊसफुल्लच्या पाट्या दिसत आल्या. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसमध्ये यशस्वी खाते उघडले आणि आजपर्यंत तो सिलसिला मराठी चित्रपटांनी सुरू ठेवला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी यंदाचे वर्ष ऐतिहासिक ठरले. यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत तब्बल ३५ हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपटांचे विषय वेगळे होते. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटाने मराठी शाळांच्या सद्य:स्थितीवर भाष्य केले.

Marathi Movies 2026
Mumbai University Paper Leak: मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरण सीआयडीकडे; व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत ३२ कोटीचा व्यवसाय केला. 'तुंबाडची मंजुळा' या हॉरर कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानेही १९.३४ कोटी रुपयांची कमाई केली.

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या कौटुंबिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०.२३ कोटी रुपये कमावले तर ‘घबाडकुंड' चित्रपटाने ८.२६ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. ७५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात १३० कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली असून, तो मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळबंद २' हा भक्तिमय चित्रपट २०२६ मधील सर्वात मोठा 'सरप्राईज हिट' ठरला. अवघ्या १० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणत १०५.११ कोटीची ऐतिहासिक कमाई केली. एकंदरीत दर्जेदार विषय आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पुन्हा आपले 'साम्राज्य' प्रस्थापित केले.

चित्रपट प्रदर्शित झाला म्हणजे जबाबदारी संपत नाही. चित्रपट यशस्वी होण्यासाठी तो चित्रपट पहिल्यांदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावा लागतो. चित्रपट कायम चर्चेत ठेवता यायला हवा. चित्रपटाचे मार्केटिंग जोरात करावे लागते. हेच व्यवसायाचे गमक असते. यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटापैकी आणखी तीन-चार चित्रपट चांगला व्यवसाय करू शकले असते. परंतु काही गोष्टींमध्ये ते मागे पडले.

- दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

खरं तर २०२६ हे वर्ष मराठी चित्रपटासाठी 'सुवर्ण वर्ष' ठरले आहे. अनेक दर्जेदार, वेगळ्या धाटणीचे विषय असलेले मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. 'राजा शिवाजी', 'देऊळबंद २' दोन्ही चित्रपट तुफान चालले. दोन्ही चित्रपट १०० कोटींच्या पार गेले. या दोन्ही चित्रपटांचे विषय मराठी अस्मितेशी, मराठी मातीशी जोडणारे आहेत. हे प्रेक्षकांना जवळचे वाटले. त्यामुळे चित्रपटांना हे यश मिळाले आहे.

- प्रवीण तरडे, अभिनेते, दिग्दर्शक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news