

मुंबई: मतदार यादीच्या सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत शाळेतून पूर्णवेळ मुक्त करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मंगळवारी दिले आहेत.
त्यामुळे आधीपासूनच एसआयआरच्या कामामुळे अनेक दिवस शिक्षकांशिवाय सुरू असलेल्या वर्गांवर आणखी पाच दिवस परिणाम होणार असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे टाळायचे, असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीच्या सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेसाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी या शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी तसेच शाळेची वेळ संपल्यानंतर एसआयआरचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचे नुकसान कमी व्हावे म्हणून काही शिक्षकांच्या कामकाजाच्या वेळेत तात्पुरते बदलही करण्यात आले होते.
मुंबई आणि मुंबई उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार एसआयआरचे काम नियोजित मुदतीत पूर्ण करण्यासाठी आता संबंधित शिक्षकांना सलग पाच दिवस पूर्णवेळ शाळेतून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी शिक्षण निरीक्षकांना पाठविलेल्या पत्रात २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत एसआयआरच्या कामासाठी नियुक्त सर्व शिक्षकांना शाळेतून पूर्णवेळ सोडण्याच्या सूचना सर्व शाळा व महाविद्यालयांना देण्याचे निर्देश दिले आहेत.
या आदेशामुळे मुंबईतील अनेक शाळांमध्ये अध्यापनाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीसारखी महत्त्वाची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असले तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सातत्याने परिणाम होणार नाही, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.