पुढारी ऑनलाईन डेस्क : एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या बहुप्रतीक्षित 'ऑटोग्राफ'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट दिग्दर्शक सतीश राजवाडे यांची ही सांगीतिक प्रेमकथा ३० डिसेंबर २०२२ रोजी राज्यभरात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाली आहे. शनिवारी प्रदर्शित या चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला. या टीझरमध्ये अंकुश चौधरीसह अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे आणि मानसी मोघे काही महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये दिसतात. त्यातून ही एक सांगीतिक प्रेमकथा आहे आणि तिला विरहाची किनार आहे, हे लक्षात येते.
टीझरमधून जे समोर येते ते हे कि ही काही केवळ एक प्रेमकथा नाही तर त्यापेक्षाही बरेच काही आहे. 'ऑटोग्राफ' ही नातेसंबंधांवर बेतलेली कहाणी आहे. ती काहीशी गुंतागुंतीची, बहुआयामी आणि शेवटी हवीहवीशी वाटणारी अशी ही कथा आहे. प्रेम कमी होवू शकते पण नाती आयुष्यभाराची असतात. काही माणसे अपघाताने भेटतात, पण मग आपलीशी होतात आणि तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. आपण जे आहोत ते होण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो…" 'ऑटोग्राफ'या नावाचा कथेशी काय संबंध, याबाबत टीझरमध्ये पुरेशी माहिती मिळत नाही, पण त्याचे महत्व मात्र टीझर अधोरेखित करतो.
'ऑटोग्राफ'शी चित्रपटसृष्टीतील दोन महत्त्वाची नावे जोडली गेली आहेत, दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि चित्रपटाचे निर्माते एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट. मुंबई-पुणे-मुंबई ही चित्रपट मालिका, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते… या प्रेमकथांमुळे सतीश राजवाडे हे नाव सर्वश्रुत झाले आहे तर एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे यापूर्वीचे चित्रपट त्यांच्या यशाची गाथा अधोरेखित करतात. 'ऑटोग्राफ'या नावांमुळे अपेक्षा उंचावून गेला आहे आणि रसिकांमध्ये त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना राजवाडे म्हणाले, "या चित्रपटामध्ये आपल्या प्रियजनांना एकत्र आणण्याची ताकद आहे. आपल्या आयुष्यात ज्यांचा अविभाज्य सहभाग होता त्यांची आठवण चित्रपट करून देतो. हा चित्रपट अशा व्यक्तींबद्दल आहे की ज्यांनी आपल्या आयुष्याला वळण दिले आहे आणि एखाद्या 'ऑटोग्राफ'प्रमाणे आपल्या आयुष्यावर अनोखी अशी छाप पडली आहे. आपल्या प्रत्येकाची स्वतःची अशी एक प्रेमकथा असते आणि त्यातील काही या अव्यक्त असतात तर काही छुप्या असतात. मनाच्या कोपऱ्यात खोलवर त्यांना स्थान असते, आणि त्या आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतात. 'ऑटोग्राफ' आपल्याला या सर्व प्रिय क्षणांची आठवण करून देईल. चित्रपटात आनंदाचे अनेक क्षण आणि दुःखाची झालर असलेल्या अनिवार्य अशा क्षणांची आठवण करून देतो. पण सरतेशेवटी, ही हृदयाला भिडणारी एक कथा असून आपल्यातील प्रत्येकजण ती आयुष्यभर जपून ठेवेल अशी आहे."
"ही कथा एकमेवाद्वितीय अशी आहे. प्रेक्षकांच्या मनावर ती खोलवर अनोखा असा परिमाण कोरून ठेवेल," असे उद्गार चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया यांनी काढले. ते म्हणतात, "याचे बरेचसे श्रेय हे चित्रपटाचे प्रतिभावान दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना जाते. कारण त्यांनी सातत्याने दर्जेदार काम केले आहे. आता चित्रपट प्रेक्षकांसमोर घेवून जाण्याची प्रतीक्षा करतो आहोत. ते आम्हाला भरपूर प्रतिसाद देतील असा पूर्ण विश्वास आहे."
हेही वाचा :