Sulochana Chavan : ‘ठसकेबाज’ लावण्यांची सम्राज्ञी सुलोचना चव्हाण

sulochana chavan
sulochana chavan

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क – सुलोचना चव्हाण यांचा जन्म मुंबईत झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव महादेव कदम तर आईचे नाव राधाबाई होते. चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या सुलोचना (Sulochana Chavan) यांनी वयाच्या दहाव्या वर्षी 'कृष्णसुदामा' या चित्रपटासाठी सर्वप्रथम मराठी गाणे गायले. या चित्रपटाच्या श्यामसुंदर पाठक व भट्टाचार्य या संगीत दिग्दर्शकांच्या जोडीने त्यांना प्रथम गायनाची संधी दिली. (Sulochana Chavan)

संगीताचे कोणतेही शिक्षण त्यांच्याकडे नव्हते. संगीतकाराने दिलेली गाण्याची ताल आणि शब्द समजून घेऊन ते कोणतेही गीत सहजतेने गात असत. केवळ मराठीच नाही तर हिंदी, पंजाबी व गुजराती गाणी गाऊन त्यांनी आपला वेगळा ठसा उमठवला आहे.

कोल्हापूरच्या श्यामराव चव्हाण यांच्याशी वयाच्या २० व्या वर्षी सुलोचना यांचे लग्न झाले. त्यांचे पती शामराव यांनाही संगीताची चांगली जाण होती. सुलोचना यांना लावणी कशी गायची याचे शिक्षण श्यामराव यांनीच दिले. म्हणूनच आपल्या पतीलाच त्या गुरू मानत.

सुलोचना चव्हाण यांनी १९६२ मध्ये 'रंगल्या रात्री' या चित्रपटासाठी पहिली लावणी गायली. ती जगदीश खेबूडकर यांनी लिहिली होती. वसंत पवार यांनी ती संगीतबद्ध केली होती. 'नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची' या लावणीनंतर सुलोचना यांचे सर्व आयुष्यच बदलून गेले.

या लावणीनंतर त्यांनी 'खेळताना रंग बाई होळीचा', 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा', 'सोळावं वरीस धोक्याचं', 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला', 'राग नका धरू सजना', 'पाडाला पिकला आंबा', 'लाडे लाडे बाई करू नका', अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या गाऊन त्यांनी मराठी रसिकांना भुरळ घातली. सुलोचना यांचा आवाजाने ग्रामीण भागात आवडीची झालेली लावणी शहरी भागातही लोकप्रिय झाली.

सुलोचना चव्हाण यांना समाज कार्याचीही आवड होती. मानधनातील मोठा हिस्सा त्या सामाजिक संस्थांना देत असत. प्रेमनाथ, एस. एन. त्रिपाठी, अविनाश व्यास, चित्रगुप्त, वसंत देसाई, मोतीराम, सोनिक ओमी, के. दत्ता, प्रेमचंद प्रकाश अशा दिग्गज संगीतकारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गाणी गायली आहेत.

संगीतकार विठ्ठल शिंदे यांनीही सुलोचना यांच्याकडून अनेक लावण्या गाऊन घेतल्या आहेत. सुलोचना यांच्या टलगीन सोहळा होऊन पिवळा गावामध्ये गाजतो- माझ्या लग्नाचा बेंडबाजा वाजतोट, या लग्नगीताला लोकगायक प्रल्हाद शिंदे यांनी कोरस दिला होता. संगीत क्षेत्रातील आतापर्यंतची ही एकमेव घटना आहे. एका मोठ्या गायकाने दिलेल्या कोरसचा सुलोचना नेहमी उल्लेख करत असत.

'माझे गाणे माझे जगणे' हे आत्मचरित्र लिहून लावणीलाही अजरामर करणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्र हळहळले आहे.

पुरस्कार –

पद्मश्री (२०२२)
'मल्हारी मार्तंड'साठी मिळालेला सर्वोत्कृष्ट लावणी गायिकेचा सन्मान.
पी. सावळाराम-गंगा जमना' पुरस्कार.
राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (२०१०)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news