
Khalid Ka Shivaji Movie Screening at Cannes 2025
मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांची पहिलीच मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ची कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये झळकली. त्याची ‘मार्शे दु फिल्म’ (Marché du Film) या विभागासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या फिल्म, थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यातर्फे अधिकृत या फिल्मची निवड झालीय.
मायकेल थेवर आणि सुषमा गणवीर निर्मित, राज प्रीतम मोरे दिग्दर्शित 'खालिद का शिवाजी' या चित्रपटात क्रिश मोरे याने खालिदची भूमिका साकारली आहे. सोबत प्रियदर्शन जाधव, भरत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलाश वाघमारे आणि स्नेहलता तागडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कैलाश वाघमारे लिखित या चित्रपटाचे संवाद राजकुमार तंगडे यांनी लिहिले आहेत. तर विजय मिश्रा चित्रपटाचे डिओपी आहेत.
पाचवीत शिकणाऱ्या खालिद नावाच्या मुलाची ही कथा आहे. खालिदच्या मनात प्रश्न येतात,या प्रश्नांनी भरलेले त्याचे मन अखेर ‘शिवाजी महाराज’ शोधू लागते. या निरागस प्रश्नांमधून उगम पावणारी ही कथा केवळ एका मुलाची नाही, तर आजही अनेक मुलं, व्यक्ती, कुटुंबं ज्या भेदभावाशी झुंज देत आहेत, त्यांची आहे. खालिद एका सत्यशोधकाच्या भूमिकेत जातो आणि त्याच्या नजरेतून शिवाजी महाराजांना, त्यांच्या मूल्यांना, त्यांच्या समतेच्या विचारांना शोधतो. अशी या चित्रपटाची संकल्पना आहे.
राज मोरे यांना आधी 'खिसा'(२०२०) या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त 'बिच्छौल्या' या शाहीर लुधियानवी यांच्या कवितेवर आधारित लघुपटासाठी 'एमआयसीएफएफ २०२३'मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मिळाला होता.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राज मोरे म्हणतात, '' ही माझी पहिली फिचर फिल्म असून या चित्रपटावर मी २-३ वर्षं मेहनत घेतली आहे. माझ्या संपूर्ण टीमचे आणि निर्मात्यांचे मी आभार मानतो, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ही आनंदाची भावना शब्दांत सांगता येणार नाही. लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येऊ.''