

Pranit More Controversy KEM Doctor Sejal Pawar Apologises: स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या शोमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या डॉक्टर सेजल पवारने अखेर माफी मागितली आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सेजलवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. या पार्श्वभूमीवर तिने आपली भूमिका स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
वादाची सुरुवात प्रणीत मोरेच्या स्टँड-अप शोदरम्यान झाली. कार्यक्रमात प्रणीत मोरेने सेजलला मानवी मृतदेहांवर काम करताना किंवा शवविच्छेदनादरम्यान विनोद केले जातात का, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी डॉक्टर सेजल पवारने शरीररचनाशास्त्र (Anatomy) शिकताना काही अनुभव सांगितले. तिच्या वक्तव्याचा एक भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला.
या वक्तव्यावर डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला. अनेकांनी मृत्यूनंतर वैद्यकीय शिक्षणासाठी आपले शरीर दान करणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर राखला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले. काहींनी अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे शरीरदानासारख्या महत्त्वाच्या उपक्रमाबाबत समाजात चुकीचा मेसेज जाऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली.
वाद वाढत असताना डॉक्टर सेजल पवारच्या नावाने सोशल मीडियावर माफीचा मेसेजही व्हायरल झाला. संबंधित व्हिडिओ पुन्हा पाहिल्यानंतर लोकांच्या भावना का दुखावल्या गेल्या असतील, हे आता समजत असल्याचे म्हटले आहे.
"माझा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. मात्र हेतूपेक्षा परिणाम अधिक महत्त्वाचा असतो, याची मला जाणीव झाली आहे," असे तिने आपल्या निवेदनात नमूद केले. तसेच आपण केलेल्या वक्तव्याचे समर्थन करण्याचा किंवा त्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार नसल्याचेही तिने सांगितले आहे.
सेजल पवारने पुढे म्हटले की, "माझ्या शब्दांचा वेगळा अर्थ घेतला जाऊ शकतो, याची मला आता जाणीव झाली आहे. त्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांची मी मनापासून माफी मागते."
या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकता, व्यावसायिक जबाबदारी आणि शरीरदान करणाऱ्या व्यक्तींविषयी असलेला आदर या विषयांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना अधिक संवेदनशीलता दाखवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.