

Jarann Trailer Amruta Subhash Anita Date
मुंबई - ‘जारण’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. यावेळी अनिल शर्मा, विकास बहल, राज मेहता हे बॅालिवूड दिग्दर्शकही या सोहळ्याला उपस्थित होते. विवाहित राधा वाड्यात पाऊल ठेवताच सुरू होणाऱ्या अनाकलनीय घटना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. राधाचे भांबावलेले डोळे, वाड्यात घडणाऱ्या रहस्यमय गोष्टी आणि अनिता दातेचा मंत्रोच्चार करताना दिसणारा अवतार हे सगळे दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणणारे आहे. ट्रेलरमधून हे स्पष्ट होते, की राधाचा या वाड्याशी धक्कादायक भूतकाळ जोडला आहे. त्यामुळे या वाड्याचे गूढ काय असेल? लहानपणी राधावर झालेल्या जारणाचा हा परिणाम आहे का? यामुळे तिला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल, हे पाहाणे नक्कीच थरारक ठरेल.
प्रस्तुतकर्ता अनिस बाझमी म्हणतात, ‘’ या चित्रपटाशी मी जोडलो गेलो, हे मी माझे भाग्य समजतो. अमृता सुभाषला मी आधीपासूनच ओळखतो. अतिशय हुशार अभिनेत्री आहे आणि तिच्यामुळेच मी या चित्रपटाचा भाग झालो, असे म्हटले तरी चालेल. जेव्हा मी हा चित्रपट बघितला. मी सुन्न झालो. कथा, दिग्दर्शन, अभिनय अप्रतिम. मराठीत पदार्पण करण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता चित्रपट असूच शकत नाही.‘’
दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात, “ ‘जारण’ हा मानवी भावनांची आणि अंधश्रद्धेच्या परिणामांची खोल उकल करणारा चित्रपट आहे. अनिता दाते आणि अमृता सुभाष यांचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करेल.”
निर्माते अमोल भगत म्हणतात, “ या चित्रपटातून अंधश्रद्धा आणि मानसिकतेतून होणाऱ्या छळाचे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा थरारपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.” ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ५ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले, अमोल भगत आणि नितीन कुलकर्णी यांची निर्मिती तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.