

Pawandeep Rajan Car Accident
नवी दिल्ली : गायक पवनदीप राजनच्या कारचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत तो जखमी झाल्याचे समजते. लखनऊ-दिल्ली हायवेवर रविवार रात्री अडीच वाजण्याच्या जवळपास ही दुर्घटना झाली. गायक पवनदीप राजन आणि त्याच्यासोबत मित्र अजय महर, ड्रायव्हर राहुल जखमी झाले आहेत. पवनदीप उत्तराखंडमधील चंपावत येथील राहणारा आहे. तेथूनच तो दिल्ली येथे जात होता. हायवेवर थांबलेल्या कंटेनरमध्ये त्याची कार मागून घुसली. तिघेही जखमी असून त्यांना उपचारासाठी नोएडा येथे नेण्यात आले आहे.
पवनदीप राजनचे दोन्ही पाय आणि हात फ्रॅक्चर झाले आहेत. पवनदीप राजन , अजय महर आणि कार चालक राहुल सिंह रविवारी रात्री अडीच वाजता कारमधून चंपावतहून दिल्ली जात होत. दरम्यान, गजरौलामध्ये हायवेवर सीओ कार्यालयासमोर सामने उभारलेल्या कंटेनरमध्ये यांची कार घुसली. ही दुर्घटना चालकाला डुलकी लागल्याने झाल्याचे म्हटले जात आहे. कारचा चक्काचूर झाला असून पवनदीप राजनचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्या तिघांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पवनदीप राजनसहित इतर दोघांना नोएडा येथे नेण्यात आले.
ही घटना इतकी गंभीर होती की, गाडीचे इंजिन तुटले. यावरून अंदाज लावला जात आहे की, गाडी भरधाव होती. यावेळी गाडीचे एअरबॅग उघडले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अजय मेहरा पवनदीपचा मित्र आणि शेजारी आहे. सोमवारी सकाळी त्यांची हैदराबादसाठी फ्लाईट होती. तिथे एका कार्यक्रमासाठी त्यांना जायचं होतं. जवळपास रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे तिघे दिल्लीकडे निघाले होते.