

एचबीओ इंग्लंडच्या वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेला हॅरी पॉटरच्या टेलिविजन सिरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. नुकतीच कंपनीने या सिरीजच्या रिलीजची घोषणा केली आहे. यासोबतच एचबीओने शेयर केले की या रिबूट शोचा प्रीमियर 2027 मध्ये होणार आहे. एचबीओने यावेळी या कलाकारांचा फर्स्ट लुकही शेअर केला आहे. यामध्ये डॉमिनिक मॅकलॉघलीन हा हॅरी पॉटर साकारणार आहे.
एचबीओचे अध्यक्ष आणि सीईओ केसी ब्लॉयसने हे सुतोवाच केले होते की 2027 मध्ये या शोच्या रिलीजची शक्यता आहे.
या सिनेमात डॉमिनिक मॅकलॉघलीन हॅरी पॉटरच्या भूमिकेत दिसणार आहे. अत्यंत हुशार आणि चतुर जादूगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरमाईनीच्या व्यक्तिरेखेत अरबेला स्टँटन दिसणार आहे. तर हॅरीच्या जिवलग मित्राच्या म्हणजेच रॉन विज्लीच्या भूमिकेत अॅलेस्टार स्टाऊट दिसणार आहे.
तर होगवर्डसचे लोकप्रिय मुख्याध्यापक डंबलडोरच्या भूमिकेत जॉन लिथागो, मॅकगोनॅगलच्या भूमिकेत जेनेट मॅकटीर, सगळ्यांना धारेवर धरणाऱ्या प्रोफेसर स्नेप च्या भूमिकेत पापा एसिडू आणि त्रिकूटाचा लाडका मित्र हॅग्रीडच्या भूमिकेत निक फ्रॉस्ट यांचा समावेश आहे.
संपूर्ण सिरिजमध्ये ड्रेको मॅलफोय या पात्राला प्रेक्षकांचे खास प्रेम मिळाले. सिनेमात ही व्यक्तिरेखा टॉम फेल्टनमे साकारली होती. एचबीओने या भूमिकेसाठी लॉक्स प्रॅटला निवडले आहे. तर लुसियस मॅलफोय ही व्यक्तिरेखा जॉनी फ्लिन साकारत आहेत.
मागील वर्षी एचबीओचे अध्यक्ष आणि सीईओ केसी ब्लॉयस 2024 मध्ये एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले होते की, आम्ही आता या सिरिजसाठी लेखन आणि कास्टिंगची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे 2027 ही रिलीजची शक्यता असू शकते.
कलाकारांच्या वयात होणारे बदल लक्षात घेता दोन्ही सीझनमध्ये फार अंतर वाटू नये यासाठी हे दोन्ही सीझन एकामागोमाग एक चित्रित केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॅनियल रॅडक्लिफने अजरामर केलेली हॅरीची व्यक्तिरेखा डॉमिनिक मॅकलॉघलीन साकारतो आहे. डॉमिनिकची ही पहिलीच भूमिका आहे. 9 ते 11 वयाच्या कलाकारांसाठी असलेल्या ऑडिशनमधून डॉमिनिकची निवड झाली आहे. या तिघांचे फोटो मॅक्सने शेयर केल्यानंतर अनेकांनी डॉमिनिकचे या आयकॉनिक भूमिकेसाठी अभिनंदन केले आहे.