रजनीकांतचा सिनेमा कुली रिलीजपूर्वीच चर्चेत आहे. नुकतेच या सिनेमातील मोनिका गाणे व्हायरल होत आहे. या गाण्यात अभिनेत्री पूजा हेगडेने तिचा जलवा दाखवला आहे. पण या गाण्यासोबतच व्हायरल होत असलेली अजून एक गोष्ट आहे. ती आहे सौबिन शाहीरचा डान्स. सौबिन या गाण्यात धमाल नाचतो आहे. अनेकांनी त्यांच्या या डान्सचे तोंडभरून कौतुकही केले आहे.
वेगाने व्हायरल होत असलेल्या गाण्यात पूजा हेगडेच्या अदांनी अनेकांना वेड लावले आहे. लाल गाऊनमधील पूजा यात कमालीची खास दिसते आहे. पण तिच्यासोबत असलेला सौबिन शाहीर मात्र या गाण्यात चांगलाच भाव खाऊन गेला आहे.
12 ऑक्टोबर 1983मध्ये कोचीमध्ये जन्म झालेल्या सौबिन शाहीरने कॅमेराच्या मागून करियरची सुरुवात केली. असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. 2013 मध्ये ‘अन्नायुम रसूलुम' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला. 2015 च्या प्रेमममधून त्यांना ओळख मिळाली. तर सुदानी फ्रॉम नयाजेरिया साठी पुरस्कारही मिळाला.
यानंतर ते हिंदी प्रेक्षकांनाही माहिती झाले ते कुंभलगी नाईट्स आणि मंजुमेल बॉयज या सिनेमातून. या दोन्ही सिनेमातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचे कौतुक मिळाले.
सोशल मिडियावर फॅन्स सौबिनच्या जुन्या डान्स क्लिप शोधत आहेत. यातून ते एक उत्तम डान्सर आहेत हे सिद्ध होत आहे. एका युजरने मल्याळी सिनेमा भीष्म पर्वतम यात मून वॉक करतानाचा व्हीडियो शेयर केला आहे.
तर दूसऱ्या युजरने सौबिनला लाजाळू मुलगा संबोधत डान्सचे कौतुक केले आहे. तर काहीनी दिग्दर्शकाचे आभार मानले आहेत.
सौबिन सध्या फॅन्सच्या प्रशंसेचा आनंद घेत आहेत. या दरम्यान सौबिन यांच्या प्रेमम सिनेमातील काही मीम देखील यावेळी चाहते शेयर करत आहेत.
लोकेश कनगराज यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. रजनीकांत यांची मुख्य भुमिका असलेल्या या सिनेमात नागार्जुन, उपेन्द्र, सौबिन शाहिर, सत्यराज, श्रुति हासन, रेबा मोनिका जॉन, जूनियर एमजीआर आणि मोनिशा ब्लेसी हे कलाकार दिसत आहेत. हा सिनेमा 14 ऑगस्टला रिलीज होतो आहे.