

Gautami Patil Kon Honar Crorepati: महाराष्ट्रात आपल्या नृत्याने आणि हटके अंदाजाने लोकप्रिय झालेली गौतमी पाटील आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’मध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमात गौतमीसोबत शिव ठाकरेही सहभागी होणार आहे. नुकताच या भागाचा प्रोमो समोर आला असून, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका माधुरी दीक्षित यांच्यासमोर गौतमीने आपल्या कलाविश्वातील ओळखीबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.
गौतमी पाटील म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर लावणी आणि तिच्या नृत्याचे कार्यक्रम येतात. मात्र, आपली ओळख केवळ लावणी कलाकारापुरती मर्यादित नसल्याचं गौतमीने ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर स्पष्ट केलं.
सोनी मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये गौतमी पाटील आणि शिव ठाकरे एकत्र दिसत आहेत. गौतमी आणि शिव ठाकरे हॉटसीटवर बसतात. त्यावेळी गौतमी आपल्या नृत्यप्रकारांबद्दल बोलताना म्हणते, ‘गौतमी नाव आलं की, लावणी हे नाव येतं. मी माझ्या कार्यक्रमात एकच लावणी करते’.
पुढे ती म्हणते, ‘बाकी सगळे वेस्टर्न गाणी किंवा माझी स्वत:ची गाणी असतात, त्या गाण्यांवर मी नृत्य सादर करते. मला इथे आता सांगायचं आहे की, मी फक्त लावणी कलाकार नाही’.
‘कोण होणार करोडपती’च्या या विशेष भागात गौतमी पाटीलसोबत शिव ठाकरेही सहभागी होणार आहे. दोघांची एकत्र एन्ट्री, माधुरी दीक्षित यांच्यासोबतचा संवाद आणि कार्यक्रमातील त्यांची धमाल पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
माहितीनुसार, गौतमी पाटील आणि शिव ठाकरे यांचा हा विशेष भाग शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे या दोघांना एका वेगळ्या मंचावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
दरम्यान, गौतमी पाटील सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिच्या नृत्याचे व्हिडीओ आणि रील्स अनेकदा चर्चेत असतात. आता ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर तिने केलेल्या वक्तव्यामुळे तिच्या या कार्यक्रमाची उत्सुकता आणखी वाढली आहे.