

The Raja Saab Theatre Fire: 'द राजा साब' 9 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होताच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी प्रभासच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढोल-ताशे, फटाके, तर कुठे विचित्र पद्धतीने जल्लोष सुरू होता. मात्र ओडिशातील एका थिएटरमधील जल्लोषचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील अशोक थिएटरमध्ये ‘द राजा साब’ची स्क्रीनिंग सुरू असताना काही चाहत्यांनी कन्फेटी (रंगीत कागद) पेटवले. काही क्षणांतच त्या कागदांना आग लागली आणि थिएटरमध्ये गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रेक्षकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुदैवाने वेळेत परिस्थिती नियंत्रणात आली आणि जीवितहानी झाली नाही.
व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी संतप्त झाले आहेत. “अशा वर्तनामुळे केवळ चित्रपट पाहण्याचा अनुभवच नाही, तर लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो,” अशी टीका होत आहे. काहींनी तर “ही प्रभासच्या नावाची बदनामी आहे,” असेही म्हटले.
दरम्यान, चित्रपटाच्या कमाईकडे पाहिले तर ‘द राजा साब’ने देशभरात पहिल्याच दिवशी सुमारे 45 कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे. पेड प्रीव्यूची कमाई धरली तर एकूण कलेक्शन सुमारे 54.15 कोटींवर पोहोचले आहे, अशी माहिती Sacnilkने दिली आहे.
तेलुगूमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटात संजय दत्त, बोमन इराणी, मालविका मोहनन, रिद्धी कुमार, योगी बाबू, निधी अग्रवाल आणि ब्रह्मानंदम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती यांनी केले आहे.
एकूणच, चाहत्यांचा उत्साह वाढला असला तरी सार्वजनिक ठिकाणी अशा धोकादायक प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा, जल्लोषाचा आनंद क्षणातच मोठ्या दुर्घटनेत बदलू शकतो.