

Fawad Khan Atif Aslam eight Pakistani artists Instagram account banned in India
नवी दिल्ली :
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढताना दिसत आहे. परिणामी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे यूट्यूब चॅनल भारतात ब्लॉक करण्यात आले. शिवाय माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचे यूट्यूब चॅनल भारतात बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता खेळाडू अर्शद नदीमचे इन्स्टाग्राम अकाऊंट आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम, हरिस रौफ, मोहम्मद रिजवान आणि शाहीन आफ्रिदी यांचे इंस्टाग्राम अकाउंटही ब्लॉक केले आहेत. आता यात भर पडलीय ती पाकिस्तानी कलाकारांची. यामध्ये अभिनेता फवाद खान आणि गायक आतिफ अस्लमचा समावेश झाला आहे. या दोघांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारतात बंद करण्यात आले आहेत.
त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट उघडले असता अकाऊंट नॉट अवेलेबल इन इंडिया असा मेसेज दिसत आहे. एकूण ८ पाकिस्तानी स्टार्सचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारतात बंद करण्यात आले आहेत. हानिया आमिर आणि माहिरा खानचे अकाऊंट आधीच भारतात बॅन झाले होते.
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूरचा चित्रपट 'अबीर गुलाल' ९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण पहलगाम हल्ल्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. या चित्रपटातील गाणीही यूट्यूब हटवण्यात आलीय. आता त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट देखील भारतात भारत सरकारने बंद केलं आहे. गायक आतिफ असलम, अभिनेता फिरोज खान, सजल अली, युम्ना जैदी, माया अली, फरहान सईद, उस्ना शाह या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे.
सजल अलीने भारतीय चित्रपट ‘मॉम’मध्ये काम केलं होतं. श्रीदेवीने तिच्या आईची भूमिका चित्रपटात साकारली होती.
‘तेरे बिन’मधून भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध झालेली युम्ना जैदी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असायची. ‘तेरे बिन’साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री माया अलीने ‘सुनो मेरे दिल’ या मालिकेत वहाज अलीसोबत काम केले होते. या मालिकेला भारतात लोकप्रियता मिळाली होती.