

actor Bal Karve dies
मुंबई - अनेक नाटके आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मराठी भाषेतील चित्रपट, दूरदर्शन आणि मराठी रंगभूमीवरील त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगे आहे. अनेक विविधांगी भूमिकांसाठी ओळखले जात होते.
दूरदर्शनवरील चिंतामणी विनायक जोशी यांच्या पुस्तकांवर आधारित 'चिमणराव गुंड्याभाऊ' या विनोदी टेलिव्हिजन सिटकॉममध्ये चिमणराव म्हणून दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत गुंड्याभाऊंच्या भूमिकेत ते सर्वाधिक लोकप्रिय झाले होते. गुंड्याभाऊच्या भूमिकेसाठी आधी शरद तळवलकर यांचे नाव समोर आले होते, पण ते तेव्हा चित्रपटांमध्ये बिझी असल्याने कर्वे यांच्या वाट्याला ही भूमिका आली. आणि याच भूमिकेमुळे ते महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचले. प्रपंच, महाश्वेता, राधा ही बावरी, वहिनीसाहेब अशा मालिकांमध्ये त्यांनी अनेक पात्रे साकारली होती.
कर्वे हे पुण्याचे होते. त्यांचे शालेय, महाविद्यालयीन आणि पुढील अभियांत्रिकी पदवी शिक्षण पुण्यातच झाले. बाळ कर्वे यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण’ असे आहे. पण पूर्ण नाव घेण्याऐवजी नुसतेच ‘बाळ’ हेच नाव पुढे रूढ झाले. ‘कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे’ येथून ते ‘स्थापत्य अभियंता’ झाल्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून नोकरीला लागले. तब्बल ३२ वर्षे नोकरीनंतर ते मुंबईत पार्ले येथे एका नातेवाईकाकडे राहिले. त्याच इमारतीत सुमंत वरणगांवकर राहायचे. ते रंगभूमीशी संबंधित होते. नाटकाची आवड असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. पुढे दोघांनी मिळून ‘किलबिल बालरंगमंच’ अशी संस्था स्थापन केली. या माध्यमातून ते बालनाट्ये बसवू लागले.
कर्वे यांनी दहा ते पंधरा मराठी चित्रपट केले. ‘जैत रे जैत’ हा त्यांचा पहिला चित्रपट. बन्याबापू (१९७८), लपंडाव (१९९३), गोडी गुलाबी (१९९१), चातक चांदणी (१९८२) हे अन्य चित्रपटांमधून त्यांनी आपली अभिनयाची छाप सोडली.
१९७८ मध्ये दामू केंकरे दिग्दर्शित सूर्याची पिल्ले या मूळ नाटकाचे कर्वे एक भाग होते. त्यामध्ये माधव वाटवे, दिलीप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापूरकर, शांता जोग यांचा समावेश होता. दूरदर्शनवरील गजानन जहागीरदार दिग्दर्शित ‘स्वामी’ या मालिकेत त्यांनी ‘गंगोबा तात्या’ भूमिका साकारली होती. ‘उंच माझा झोका’ या मालिकेच्या एकाच भागात त्यांनी ‘गणेश शास्त्री’ ही वैद्यराजांची भूमिका साकारली होती.
कर्वे यांना २०१८ मध्ये जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. बाळ कर्वे यांना गुंड्याभाऊच्या भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचे दोन पुरस्कार मिळाले होते.