

CBFC New Rules for Filmmakers: चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी निर्मात्यांना अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमधून जावे लागते. यामध्ये सेन्सॉर प्रमाणपत्र मिळवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया असते. मात्र, आता केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) चित्रपट निर्मात्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, अपूर्ण चित्रपट प्रमाणपत्रासाठी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच, चित्रपटाचे नाव जाहीर केले असले तरी त्यात बदल करण्याची सूचना मंडळ देऊ शकते. विशेष म्हणजे, चित्रपटाची रिलीज डेट जवळ आली म्हणून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार नाही.
CBFC ने 26 ऑक्टोबर 2026 रोजी ही नवी सूचना जारी केली. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंह यांनी या सूचनेवर स्वाक्षरी केली आहे. चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या काही दिवस आधी प्रमाणपत्रासाठी धावपळ करण्याऐवजी आधीपासूनच नियोजन करावे, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
CBFC च्या नव्या सूचनेनुसार, निर्मात्यांना प्रमाणपत्रासाठी चित्रपटाची अंतिम आवृत्तीच सादर करावी लागणार आहे. चित्रपटातील सर्व ग्राफिक्स, पार्श्वसंगीत, गाणी आणि दिव्यांग प्रेक्षकांसाठी आवश्यक सुविधा पूर्ण असणे गरजेचे आहे. तात्पुरते ग्राफिक्स, अपूर्ण दृश्ये किंवा काही भाग बाकी असलेला चित्रपट प्रमाणपत्रासाठी पाठवता येणार नाही.
अशा प्रकारे अपूर्ण चित्रपट सादर केल्यास अर्जाच्या प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये अर्ज नाकारलाही जाऊ शकतो. विशेष म्हणजे, चित्रपटाचा अर्ज मंडळाकडे पाठवला म्हणजे तो अधिकृतपणे स्वीकारला गेला असे मानले जाणार नाही. अर्ज आणि चित्रपटाची संपूर्ण माहिती तपासून ती योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच अर्ज स्वीकारला जाईल.
चित्रपटाच्या नावाबाबतही CBFC ने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव आधीच जाहीर केले असेल किंवा त्याच नावाने जाहिरात सुरू केली असेल, तरी ते नाव अंतिम असेलच असे नाही.
चित्रपटाचे नाव तपासण्याचा अधिकार प्रमाणन मंडळाला असेल. नावाबाबत आक्षेप असल्यास त्यात बदल करण्याची सूचनाही दिली जाऊ शकते. चित्रपटाच्या प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जातील नाव आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वापरलेले नाव या दोन्ही बाबींची तपासणी केली जाऊ शकते.
हा नियम सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 मधील कलम 5B(1) आणि सिनेमॅटोग्राफ प्रमाणन नियम 2024 मधील नियम 25 नुसार लागू करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाचे नाव ठरवताना निर्मात्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
अनेक चित्रपटांचे निर्माते प्रदर्शनाची तारीख कित्येक महिने आधी जाहीर करतात. त्यानंतर त्या तारखेला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रमाणपत्राची प्रक्रिया घाईघाईने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आता अशा प्रकारच्या दबावाला CBFC बळी पडणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख निश्चित असली तरी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया बदलली जाणार नाही. प्रत्येक चित्रपटाची नियमित तपासणी केली जाईल. तपासणी समिती आणि पुनर्विचार समिती कायद्यात ठरवून दिलेल्या नियमांनुसारच काम करतील.
प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाला आणि त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचे नियोजन बिघडले, तर त्याची जबाबदारी मंडळाची असणार नाही. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपट प्रमाणपत्रासाठी अगोदरच प्रोसेस करावी, असे आवाहन CBFC ने केले आहे. यामुळे चित्रपटात काही बदल सुचवले गेल्यास ते करण्यासाठीही निर्मात्यांना वेळ मिळेल.
CBFC ची ही नवी सूचना अशा वेळी आली आहे, जेव्हा काही चित्रपटांना प्रमाणपत्र मिळवताना अडचणींचा सामना करावा लागला होता. अभिनेता विजयचा 'जना नायकन' हा चित्रपट त्याचे एक उदाहरण आहे. या चित्रपटाच्या प्रमाणपत्र प्रक्रियेला विलंब झाला होता. याप्रकरणी चित्रपटाच्या निर्मात्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नव्हता.
अभिनेता दिलजीत दोसांझचा 'सतलज' हा चित्रपटही प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत अडकला होता. या चित्रपटाचे आधीचे नाव 'पंजाब 95' होते. CBFC कडून मंजुरी न मिळाल्याने हा चित्रपट अधिकृतरीत्या प्रदर्शित होऊ शकला नाही. नंतर तो झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुपचूप प्रदर्शित करण्यात आला. मात्र, काही तासांतच तो हटवण्यात आला.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यातही CBFC ने काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर आता मंडळात 18 नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच CBFC ची नव्या सदस्यांसह पुनर्रचना करण्यात आली आहे.
या नव्या सदस्यांच्या यादीत अभिनेत्री प्रीती झिंटा, अभिनेता पंकज त्रिपाठी, सुनील शेट्टी, पल्लवी जोशी, रिकी केज आणि सुप्रिया यार्लागड्डा यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश आहे.
CBFC च्या नव्या सूचनेमुळे चित्रपट निर्मात्यांना प्रमाणपत्राची प्रक्रिया अधिक गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. चित्रपट पूर्ण नसताना प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे किंवा प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यावर घाई करणे आता निर्मात्यांना महागात पडू शकते.