

bollywood ranbir kapoor hints at quitting acting after a decade after ramayana release fans worried video viral
पुढारी ऑनलाईन : ‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवरील अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. अशातच रणबीर कपूरच्या एका विधानामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनय सोडण्याबाबत त्याने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. त्यामुळे प्रदर्शनानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अनेक विक्रम मोडले आहेत. दरम्यान, रणबीरच्या एका विधानाने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. रणबीरने अभिनय सोडण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
रणबीर कपूरने अभिनय सोडण्याचे संकेत दिले आहेत का?
रणबीर कपूर नुकताच बीबीसी एशियन नेटवर्कच्या एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकाबद्दल सांगितले. कोणताही मोठा ब्रेक न घेता आपण सातत्याने एका चित्रपटानंतर दुसऱ्या चित्रपटात काम करत असल्याचे त्याने सांगितले. याचदरम्यान त्याने एक धक्कादायक विधान केले.
रणबीर म्हणाला, “मला वाटते की एक अभिनेता म्हणून हे माझे शेवटचे दशक आहे.” त्याचे हे वक्तव्य ऐकून ‘रामायण’ चित्रपटातील त्याची सहकलाकार साई पल्लवीदेखील आश्चर्यचकित झाली. तिने लगेचच ‘ओह...’ अशी प्रतिक्रिया दिली.
रणबीरने आपल्या विधानाचा अर्थ केला स्पष्ट
यानंतर रणबीर कपूरने आपल्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट केला. सध्या त्याला ज्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे, त्याबद्दल तो बोलत असल्याचे त्याने सांगितले.
आपली भूमिका स्पष्ट करताना रणबीर म्हणाला, “माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की, मला अशा प्रकारच्या भूमिका पुन्हा कुठे साकारायला मिळणार आहेत?” त्याचा रोख ‘रामायण’सारख्या भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटांकडे होता.
रणबीरच्या वक्तव्यामुळे चाहते निराश
रणबीर कपूरच्या या वक्तव्यानंतर त्याचे चाहते चांगलेच निराश झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्याला अभिनयातून निवृत्ती न घेण्याची विनंती केली आहे. एका चाहत्याने लिहिले, “असे बोलू नकोस रणबीर! तू अजून फक्त ४४ वर्षांचा आहेस. पुढील दोन दशके तरी तुला काम करताना पाहायचे आहे. हे ऐकून मन दुखावले.” दुसऱ्या चाहत्याने म्हटले, “‘अभिनेता म्हणून शेवटचे दशक’ म्हणजे नेमके काय?
रणबीर कपूर, असे काही बोलू नकोस! तू वयाच्या ८५ वर्षांपर्यंत अभिनयातून निवृत्त होऊ शकत नाहीस. आलिया, कृपया याला समजाव!” तर आणखी एका चाहत्याने विनंती करत लिहिले, “रणबीर, कृपया वयाच्या ८५ वर्षांपर्यंत अभिनय कर. आणखी किमान ४० चित्रपट कर. ज्या कलेमध्ये तू इतका पारंगत आहेस, ती सोडून निवृत्ती घेऊ नकोस.” अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असून रणबीरच्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शनातही रणबीरला रस
दरम्यान, रणबीर कपूर आता अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच मुलाखतीत त्याने लवकरच दिग्दर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे, रणबीरने आपल्या पहिल्या चित्रपटाची पटकथा लिहिण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट प्रत्यक्षात आणण्याचा त्याचा मानस आहे.
‘रामायण’ चित्रपटाबद्दल जाणून घ्या
‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय लारा दत्ता, अरुण गोविल आणि रकुल प्रीत सिंह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
दोन भागांमध्ये साकारण्यात आलेली ही भव्य गाथा हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट आयमॅक्समध्येही प्रदर्शित करण्याची योजना आहे. ‘रामायण’चा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित झाला असून दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.