

shopkeeper has written outside the shop that women are not allowed here
पुढारी ऑनलाईन : एका दुकानदाराने आपल्या दुकानात महिलांना येण्यास बंदी घातली आहे. दुकानाबाहेर त्याने स्पष्ट शब्दांत, ‘या दुकानात महिलांना येण्यास मनाई आहे. केवळ पुरुषच येऊ शकतात,’ असा मजकूर लिहिला आहे. एवढेच नव्हे, तर दुकानाबाहेर आणखी एक संदेश लिहिला आहे. ‘हे देवा! या दुकानात कमीत कमी ग्राहक पाठव,’ असे त्यात म्हटले आहे. दुकानदाराच्या या अनोख्या संदेशाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. या दुकानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील राजापूर येथील घनश्याम बाबा यांच्या दुकानाबाहेर हे संदेश लिहिण्यामागे एक वेगळेच कारण आहे. दुकानाच्या आजूबाजूला मद्यपींचा जमाव आणि त्यांच्या त्रासदायक वर्तनामुळे दुकानदाराने हा निर्णय घेतला आहे.
घनश्याम यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दुकानाच्या परिसरात लोकवस्ती कमी आहे. आजूबाजूलाही फारशी घरे नाहीत. त्यामुळे संध्याकाळ होताच दुकानाच्या आसपास मद्यपींचा जमाव जमू लागतो. दारूच्या नशेत असलेले लोक ये-जा करणाऱ्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी करतात. विशेषतः दुकानात सामान खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिलांना पाहून अश्लील शेरेबाजी केली जाते. त्यांच्या या असभ्य वर्तनामुळे महिलांना अस्वस्थ वाटते.
दुकानदाराने दुकानाबाहेर असे का लिहिले?
घनश्याम यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी त्यांच्या दुकानात महिलाही खरेदीसाठी येत असत. मात्र, दुकानाच्या आसपास मद्यपींचा वावर आणि त्यांच्याकडून होणाऱ्या शेरेबाजीमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत होता. महिलांसोबत कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित घटना घडू नये, या भीतीतून त्यांनी दुकानात महिलांना येण्यास मनाई असल्याचा संदेश लिहिला. संध्याकाळ होताच मद्यपींचा जमाव जमतो आणि त्यामुळे दुकानातील वातावरण बिघडते, असेही त्यांनी सांगितले.
घनश्याम यांच्या दुकानाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यांनी दुकानाच्या चारही बाजूंना रामचरितमानसमधील चौपाया आणि संत कबीर यांचे दोहे लिहिले आहेत. मात्र, या धार्मिक संदेशांच्या मधोमध महिलांच्या प्रवेशावर बंदी घालणारा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर दुकानाचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दुकानाबाहेर लिहिलेले दोन्ही संदेश दिसत आहेत. या संदेशांवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दुकानदाराची अडचण समजण्यासारखी असली, तरी मद्यपींच्या गैरवर्तनाची शिक्षा महिलांना देणे योग्य नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या आणि महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या लोकांविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. त्यामुळे महिलांना बाजारपेठेत सुरक्षित वातावरण मिळेल आणि दुकानदारालाही अशा प्रकारचा निर्णय घेण्याची वेळ येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.