Ramayana : रामायणच्या निर्मात्‍यांचा कडक इशारा, जर चित्रपट लीक केला तर..

‘रामायण’चे क्लिप्स सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांना मेकर्सचा इशारा; परवानगीशिवाय व्हिडीओ पोस्ट केल्यास होणार कायदेशीर कारवाई!
Ramayana Film
Ramayana : रामायणच्या निर्मात्‍यांचा कडक इशारा, जर चित्रपट लीक केला तर.. file photo
Published on: 
Updated on: 

bollywood ramayana makers issues legal threats making video and circulating footage online ranbir kapoor film

पुढारी ऑनलाईन : ‘रामायण’ चित्रपटाचे क्लिप्स सिनेमागृहांमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करणाऱ्यांविरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी कडक इशारा दिला आहे. परवानगीशिवाय चित्रपटाचे चित्रीकरण करून त्याचे व्हिडीओ ऑनलाइन शेअर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

Ramayana Film
CM फडणवीसांनी साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी; PM मोदी म्हणाले, ‘मनाला भिडणारे पाऊल’

‘रामायण’च्या निर्मात्यांचा कडक इशारा

‘@WorldOfRamayana’ या अधिकृत एक्स अकाउंटवरून अशा प्रकारे चित्रपटाचे व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्यांसाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचे अनधिकृत फुटेज सिनेमागृहांमध्ये रेकॉर्ड केले जात असल्याची आणि ते सोशल मीडिया तसेच मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असल्याची माहिती मिळाली आहे.

नोटीसमध्ये नेमके काय म्हटले आहे?

नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने २ नोव्हेंबर २०२६ आणि ६ नोव्हेंबर २०२६ रोजी कमर्शियल आयपी सूट (L) क्रमांक ३७२३०/२०२६ अंतर्गत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीला परवानगीशिवाय चित्रपट किंवा त्यातील कोणताही भाग रेकॉर्ड करणे, अपलोड करणे, शेअर करणे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Ramayana Film
Sunny Deol Fitness : वयाच्या ६९ व्या वर्षीही सनी देओल फिट अन् तंदुरुस्त! फिटनेससाठी पाळतात ३ सोप्या सवयी

असे कृत्य कॉपीराइटचे उल्लंघन असून, कॉपीराइट कायदा १९५७, सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत तो फौजदारी गुन्हा ठरू शकतो. यासाठी कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास न्यायालयाच्या अवमानाची कारवाईही होऊ शकते, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

रेकॉर्ड केलेले व्हिडीओ डिलीट करण्याचे आवाहन

‘रामायण’च्या टीमने सर्वांना अशा प्रकारचे व्हिडीओ रेकॉर्ड करणे, पोस्ट करणे किंवा शेअर करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी असे व्हिडीओ किंवा क्लिप्स पोस्ट केले असतील, तर ते तातडीने डिलीट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती संबंधित अधिकारी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे दिली जाईल. तसेच, कोणतीही अतिरिक्त नोटीस न देता संबंधित व्यक्तींविरोधात फौजदारी, दिवाणी आणि न्यायालयाच्या अवमानाची कारवाई केली जाईल, असा इशाराही निर्मात्यांनी दिला आहे.

निर्मात्यांच्या नोटीसवर सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया

या नोटीसवर सोशल मीडिया यूजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काहींनी निर्मात्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काहींनी चित्रपटाला ट्रोल केले आहे.

एका यूजरने विचारले, ‘तुमच्या परवानगीने रिकाम्या थिएटरचे फोटो तरी काढू शकतो का?’ दुसऱ्या यूजरने उपरोधिक प्रतिक्रिया देत म्हटले, ‘अरे, एवढी घाई कशाला? एक महिन्यानंतर आला असतात. तोपर्यंत सर्वत्र व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.’

तर आणखी एका यूजरने म्हटले की, ‘तुमचा चित्रपट न चालण्यामागचे कारण पायरसी नाही, तर रामायणाच्या कथेत केलेले बदल आहेत.’

५ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला ‘रामायण’

रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. या चित्रपटात साई पल्लवी, रवी दुबे, लारा दत्ता, अरुण गोविल आणि शीबा चड्ढा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, नमित मल्होत्रा हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.