

Suraj Chavan Dream Home Video: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरांत पोहोचलेला सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आहे. आपल्या मोकळ्या स्वभावामुळे आणि 'झापूक झुपूक' अंदाजामुळे ओळख निर्माण केलेल्या या तरुणाने ‘बिग बॉस मराठी’ शो जिंकत महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण त्याचबरोबर स्वतःचं एक छोटंसं पण हक्काचं घर असाव असं त्याच स्वप्न होतं.
आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरल आहे. सूरजने आपल्या नव्या घराचा थाटामाटात गृहप्रवेश केला असून, त्या सोहळ्याचा आनंद साजरा करणारा सुंदर व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून, कलाकार मित्रांनीही त्याचं अभिनंदन केलं आहे.
आज सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे, पण त्याचा प्रवास खूप कठीण होता. बालपणीच पालकांचे छत्र हरपले, आर्थिक संकटात दिवस काढले, तरीही त्याने जिद्द सोडली नाही. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवली आणि त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’मधील विजयानं त्याचं आयुष्यच बदलून गेलं.
आज तो लाखो लोकांच्या मनात घर करून बसला आहे, आणि आता त्याने स्वतःसाठी बांधलेल्या घरात प्रवेश करताना त्याच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधानाचे भाव पाहून चाहत्यांनाही भरून आलं आहे.
आगामी काळात सूरजच्या आयुष्यात आणखी एक मोठा बदल घडणार आहे. तो लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
सूरजच्या स्वप्नातील घर साकार करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महत्त्वाची मदत केली. ‘बिग बॉस’चा सीझन संपल्यानंतर पवार यांनी सूरजला त्याच्या गावात घर उभं करण्यासाठी लागणारी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. गृहप्रवेशाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लाखो चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.