TDM : ‘ख्वाडा’, ‘बबन’ नंतर येतोय टीडीएम

TDM marathi movie
TDM marathi movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ख्वाडा' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेत यशस्वी ठरलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा 'बबन' हा चित्रपटही सुपरहिट ठरला. (TDM) ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या भाऊरावांना सिनेइंडस्ट्रीत ओळखले जाते.

'हैद्राबाद कस्टडी' हा त्यांचा सिनेमाही २०२३ ला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांचे दोन्ही सिनेमे याच धाटणीचे असले तरी भाऊराव आता एका वेगळ्या धाटणीचा नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. विशेष म्हणजे कॉमेडी जॉनर घेऊन भाऊराव पहिल्यांदाच या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील करणार आहेत. (TDM)

'चित्राक्ष फिल्म्स' आणि 'स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत तर निर्माते भाऊराव कऱ्हाडे निर्मित 'टीडीएम' या आगळ्यावेगळ्या नावाच्या सिनेमातून भाऊराव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

चित्रपटाचे पोस्टर पाहता पाठमोरा व्यक्ती नेमका कोण आहे, हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. शिवाय पोस्टरवरील गावाकडील रम्य सकाळ पाहता चित्रपटाचे कथानक नेमके काय असेल, याची उत्सुकता अधिकच ताणली जात आहे. विशेष म्हणजे या आगळ्यावेगळ्या कथेला आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला भाऊराव प्रेक्षकांसमोर कसे मांडणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्यामुळे त्यांचा हा 'टीडीएम' हा आगामी कॉमेडी जॉनरचा सिनेमा रसिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. पोस्टरवरील पाठमोरा कलाकार नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

याबद्दल  भाऊराव कऱ्हाडे म्हणाले की, एका वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शन दोन्हीची धुरा मी या कॉमेडी जॉनरच्या 'टीडीएम' चित्रपटात पेलवली आहे. वेगळाच जॉनर पहिल्यांदा करत असल्याने मी ही या चित्रपटाला घेऊन खूप उत्सुक आहे.

चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी पाहिली. टीडीएम या नावातच वेगळं काहीतरी असणाऱ्या आणि हास्याची मेजवानी घेऊन येणाऱ्या या सिनेमाची रंगत भाऊरावांनी कुठवर नेऊन ठेवलीय हे लवकरच प्रेक्षकांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news