

फुरसुंगी : 'काय तो पालिकेचा टॅक्स, काय तो कचरा, ….पालिकेचे सगळे एकदम ओके हाय; पण फुरसुंगीकरांचे नाय…' अशा आशयाचे फ्लेक्स लावत ग्रामस्थांच्या वतीने पालिकेचा निषेध करण्यात आला आहे. फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. मात्र, पालिकेकडून या ठिकाणी कोणत्याही सुविधा न देता भरमसाट कर आकारला जात आहे. महापालिकेकडून ज्या सुविधा पुरविल्या जात आहे त्या अत्यंत तोकड्या आहेत. कचराडेपोमुळे येथील पाणी दूषित झाल्याने पालिकेच्या टँकरद्वारा येथील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो; मात्र सध्या या टँकरची संख्या कमी झाली आहे. 72 कोटींची पाणी योजनाही अतिशय कुर्मगतीने सुरू आहे. काही थोड्या भागात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो, मात्र तोही अपुरा व अनियमित असतो.
येथील कालव्याचा विसर्ग बंद केल्यानंतर या ठिकाणचे पाणीटंचाईचे संकट अधिकच गहिरे होते. फुरसुंगी व परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याकडेला कचर्याचे ढीग साठले आहेत. ओढ्या-नाल्यांची व्यवस्थित सफाई करण्यात न आल्यामुळे ते तुंबले आहेत. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. मात्र, पालिका प्रशासन फक्त कर गोळा करण्यातच व्यस्त असल्यामुळे नागरिकांनी आपला रोष फ्लेक्सद्वारे व्यक्त केला आहे.
सद्यःस्थितीत पालिकेच्या भोंगळ कारभाराचा आम्ही फ्लेक्सद्वारे निषेध व्यक्त करीत आहोत, मात्र यावरही पालिका प्रशासनाला जाग न येऊन त्यांनी येथील पाणी प्रश्न, कचरा, रस्ते, आरोग्य या प्रश्नांकडे त्वरित लक्ष न दिल्यास क्षेत्रीय कार्यालयापुढे तीव— जनआंदोलन करण्यात येईल.
– सचिन हरपळे (सामाजिक कार्यकर्ते, भेकराईनगर)