

Actor Atul Kulkarni Visit Pahalgam
मुंबई : अभिनेते अतुल कुलकर्णी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर थेट पहलगाममध्ये पोहचले आहेत. "चलो काश्मीर" म्हणत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ते काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी एका बाकड्यावर बसलेले दिसत आहेत. तर एका व्हिडिओमध्ये काश्मीरी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
हा आमचा काश्मीर आहे. सिंधु, झेलमच्या किनारी चला, मी इथे आलो आहे, तुम्हीदेखील याठिकाणी या असा संदेश त्यांनी पद्याच्या ओळीतून दिलाय. त्यांनी एक पद्य शेअर केलं आहे-
''हिंदोस्तां की ये जागीर है
के डर से हिम्मत भारी है
हिंदोस्तां की ये जागीर है
के नफ़रत प्यार से हारी है
चलिए जी कश्मीर चलें
सिंधु, झेलम किनार चलें
मैं आया हूँ , आप भी आएँ''
अतुल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ''चलिए जी काश्मीर चले'' अशी टॅगलाईन दिसते. यामध्ये ते चहा आणि काश्मीरी पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळत आहे. अतुल यांच्या फोटो, व्हिडिओ पोस्टवर असंख्य सोशल मीडिया युजर्सनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.
काही काळ जाऊ द्यावा..तेथील पर्यटन पुन्हा सुरु व्हावे, असे वाटते...अशाही कॉमेंट्स सोशल मीडिया युजर्सनी केलेले दिसतात. तर काहींनी त्यांना नकारात्मक कॉमेंट्स देखील दिले आहेत. ''जेव्हा सहलीला जातो तेव्हा आनंद व्यक्त करायला जातो. जिथे लोकं मारले गेले आहेत तिथे आनंद व्यक्त करणे, एन्जॉय करणे, हनिमून साजरा करणे, चांगले दिसत नाही.'', असे एका सोशल मीडिया युजरने लिहिले आहे. तर आणखी काही युजर्सनी त्यांच्या साहसाचे, निर्भयपणाचे कौतुक केले आहे.