अशोक सराफ म्हणजे मराठी घरातील लहान थोर सगळ्यांचा आवडता कलाकार. मराठी सिनेमाच्या लाडक्या अशोक मामांच्या अनेक भूमिका, विनोदाचे टायमिंग, संवादफेक याची नक्कल अनेक कलाकार करतात. अशोक सराफ यांनी नुकताच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये धूमधडाका सिनेमातील 'व्याख्या विख्खी वुख्खू' या त्यांच्या आयकॉनिक डायलॉगमागचा किस्सा शेयर केला आहे.
याबाबत बोलताना ते म्हणतात, 'हा आयत्यावेळी सुचलेला डायलॉग. तो स्क्रिप्टमध्ये लिहिलेला नव्हता. मी पाइप घेऊन येतो समोरच्या पात्राला काय माळीबुवा धनाजीराव वाकडे इथेच राहतात काय? असे विचारले. त्यावेळी मी हातात पाइप धरला होता. या पाइपमधला तंबाकू कडक असतो. मला त्याची सवय नव्हती. मला सिगरेटची सवय होती. एकदा ओढला आणि मला ठसका आला. त्यावेळी आपोआप व्याख्या बाहेर आले. हेच संवादाचा भाग म्हणून वापरायचे ठरवले. मग व्याख्या विख्खी वुख्खू हे अशा पद्धतीने वापरले की बोलायचे व्याख्या, विख्खी, वुख्खू पण समोरच्याला काय म्हणायचे ते आपोआप समजले पाहिजे.’ अर्थातच अशोकमामांची ही ट्रिक आयकॉनिक ठरली हे वेगळे सांगायला नको.
अशीच ट्रिक त्यांनी सांगितली नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमातील . या सिनेमाच्या दरम्यान जेव्हा सुप्रिया पिळगावकर आणि कॅप्टन बाजीराव रणगाडे बनलेले अशोक सराफ भेटतात तेव्हा त्याच्या केसांवरून हात फिरवण्याच्या सीनवेळी कायम हशा पडायचा. या मागचा किस्सा सांगताना अशोकमामा म्हणतात, कोणताही पुरुष आपल्यापेक्षा सुंदर स्त्रीच्या समोर जाताना जरा केस नीट करतो, चेहरा नीट करतो. हा केसांवरून हात फिरवण्याचा टाइम स्पॅन मी थोडा वाढवला तसेच हाताची पोझिशनही थोडी बदलली. आणि ही स्टाइल सगळ्यांना खूप आवडली. याशिवाय या सिनेमातील प्रसिद्ध डायलॉगही 'सौदामिनी कुंकू लाव' ही केवळ लाव हा शब्द खेचल्याने डायलॉग लोकप्रिय झाला.
अशोकमामा म्हणतात, माझ्या अभिनयाची सुरुवात घरापासूनच झाली. आमच्या घरात कलेचे वातावरण आधीपासूनच होते. कारण माझे मामा. ते मराठी सिनेसृष्टी आणि मराठी रंगभूमीवरील मान्यवर कलाकार होते. त्यांचे नाव म्हणजे नटवर्य गोपीनाथ सावकार. मला आता जे काही थोडेफार येते ते मी त्यांच्याकडून घेतले आहे. मामा माझ्या घरीच रहात असल्याने सगळे नट त्याला भेटायला यायचे. त्यापैकी राजा गोसावी यांना मी अनेकदा पहिले. योगायोग म्हणजे त्यांच्यासोबत मला रंगभूमीवर काम करायला मिळाले.