

Tiger Shroff Firing Case : मुंबईत रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला. या घटनेने बॉलीवूडमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेत राहणारा गँगस्टर अनिल पंडित याचे नाव पुन्हा एकदा समोर आले आहे. जाणून घेऊया हरियाणातील पानिपतमधील एक गुंड ते अमेरिकेत वास्तव्य असणाऱ्या गँगस्टर अनिल पंडितबाबत...
अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर एक ऑडिओ क्लिप समोर आली. ज्यामध्ये अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याच क्लिपमध्ये अनिलने अभिनेता सलमान खानला धमकी देत, त्याला लॉरेन्स बिश्नोई आणि बिश्नोई समाजाची माफी मागण्यास सांगितले आहे. माफी न मागितल्यास सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने दिली आहे. या ऑडिओमध्ये सलमानसोबत काम करणाऱ्या चित्रपटसृष्टीतील इतर व्यक्तींनाही धमकावण्यात आले आहे. मात्र, या गोळीबारामागे नेमकी हीच टोळी आहे का, याची अधिकृत पुष्टी मुंबई पोलिसांनी केलेली नाही. तपास आता जुहू पोलिसांकडून मुंबई गुन्हे शाखेकडे (क्राइम ब्रँच) सोपवण्यात आला आहे.
अनिल पंडित (वय ३२) हा मूळचा हरियाणातील पानिपतच्या एका गावातील आहे. सध्या त्याचे वास्तव्य अमेरिकेत असल्याचा संशय आहे. मात्र अमेरिकेत वास्तव्य करण्यापूर्वी त्याचे गुन्हेगारी धागेदोरे कॅनडा, थायलंड आणि दुबईपर्यंत पसरलेले होते. हरियाणा, दिल्ली आणि पुणे येथे गोळीबार आणि खंडणीच्या अनेक प्रकरणांत त्याचे नाव समोर आले होते. यातील काही गुन्ह्यांमध्ये परदेशी बनावटीच्या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता.
दिल्लीतील गोळीबाराच्या घटनेनंतर सुमारे १५ दिवसांनी पुण्यात एका दागिन्यांच्या दुकानात गोळीबाराची घटना घडली होती. यामध्येही पंडितचे नाव समोर आले. महाराष्ट्र पोलिसांनी गोळीबारा करणाऱ्यांना अटक केली. तपासात असे निष्पन्न झाले की, त्यांचे संबंध अनिल पंडित आणि शुभम लोणकर नावाच्या आणखी एका गुन्हेगाराशी होते. पुण्यात गोळीबार करणारे तिघेही राजस्थानमधील हनुमानगड येथील असल्याचे समजते. त्यांनी विशेषतः हा हल्ला करण्यासाठीच पुण्यात प्रवास केल्याचा आरोप आहे.
हरियाणात खंडणीच्या उद्देशाने गायक दिलेर खराकिया यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातही पंडितचे नाव समोर आले होते. यानंतर, सोनीपतमध्ये दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रँच आणि हरियाणा एसटीएफने (STF) एक संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर रोहित दहिया जखमी झाला होता.
अनिल पंडितचे नाव याआधीही काही प्रकरणांमध्ये समोर आले आहे. मार्च २०२६ मध्ये, हरियाणातील पानिपत येथे एका 'मनी एक्सचेंज' कार्यालयावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी, स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगणाऱ्या काही व्यक्तींनी सोशल मीडियाद्वारे या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यात अमेरिकेत राहणाऱ्या अनिल पंडित आणि रणदीप मलिक यांच्या नावे होती. या पोस्टमध्ये गायक-रॅपर बादशाहलाही धमकी देण्यात आली होती.
पानिपतमधील गोळीबार प्रकरणी मार्च २०२६ मध्ये पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. विदेशातून मिळालेल्या सूचनेवरून हा हल्ला केल्याची कबुली हल्लेखोरांनी दिली होती. परदेशातून काम करणाऱ्या गँगस्टर्सशी संपर्क करून देणाऱ्या आणखी एका संशयितालाही पोलिसांनी पकडले. तपासातून असे समोर आले की, हा हल्ला करण्यासाठी हल्लेखोरांना ६५,००० रुपये देण्यात आले होते. तसेच अनिल पंडित हा 'डंकी रूट'द्वारे म्हणजेच स्थलांतराच्या एका बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत पोहोचला होता.
सूत्रांनुसार, भारत सोडण्यापूर्वी त्याच्याविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा नोंदवलेला नव्हता. पंडित हा पासपोर्टच्या आधारे २०२३ मध्ये देश सोडून कॅनडाला गेला. येथे तो लॉरेन्स बिश्नोई टोळीमधील रणदीप मलिक या गुंडाच्या संपर्कात आला. यानंतर तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियाला पोहोचला. यानंतर तो लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठीच काम करू लागला. सुमारे आठ महिन्यांपूर्वी, त्याने टोळीतील दुसऱ्या एका सदस्याच्या, रणदीप मलिकच्या जबाबदाऱ्या स्वतःकडे घेतल्या; त्यानंतर त्याच्यावर अनेक फौजदारी गुन्हे दाखल झाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल पंडितचा लॉरेन्स बिश्नोईशी थेट संपर्क नाही; त्याऐवजी तो 'हॅरी बॉक्सर' (मूळ नाव हरी चंद जाट) कडून सूचना घेतो. हॅरी बॉक्सर २०२२ पासून अमेरिकेतून आपली टोळी चालवत आहे. त्याच्यावर राजस्थान, पंजाब व दिल्लीमध्ये खंडणी, दरोडा आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
गेल्या वर्षी हरियाणा पोलिसांनी विविध प्रकरणांच्या संदर्भात अनिलच्या आईला आणि भावाला अटक केली होती, मात्र काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईला जामीन मिळाला आहे.