

Big B’s Emotional Tribute to Dharmendra: बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री शोकाकुल झाली आहे. 89व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या जाण्यानं अमिताभ बच्चन भावूक झाले. ‘जय-वीरू’ ही जोडी जरी पडद्यापुरती असली, तरी त्यांची मैत्री खरी आणि आयुष्यभर टिकणारी होती. आता वीरूच्या जाण्यानंतर जय म्हणजे अमिताभ बच्चन प्रचंड व्यथित झाले आहेत.
फक्त पडद्यावरच नव्हे तर अनेक वेळा एकाच मंचावर, एका फ्रेममध्ये हे दोन दिग्गज एकत्र दिसले की प्रेक्षकांना ‘शोले’ची आठवण व्हायची. काही महिन्यांपूर्वीच एका कार्यक्रमात धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चनकडे पाहत “हा माझा लहान भाऊ… अजूनही काम करताना बघून आनंद होतो” असं म्हणत कौतुक केलं होतं. त्या वेळी बिग बी भावूक झाले होते. आता मित्राच्या जाण्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर मन मोकळं केलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी लिहिले:
“आणखी एक दिग्गज आम्हाला सोडून गेला… मागे अशी शांतता ठेवून गेला जी सहन करणेही कठीण आहे. धरमजी… महानतेची जाणीव करून देणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या शरीरयष्टीइतकंच मोठं त्यांचं हृदय आणि साधेपणा होता. ते पंजाबच्या गावाची माती आपल्या सोबत घेऊन आले होते… आणि आयुष्यभर त्यावरच खरं प्रेम केलं. इंडस्ट्री बदलली, पण ते बदलले नाहीत. त्यांचं हास्य, त्यांचं आकर्षण आणि त्यांची उब… ज्यांना ते भेटले त्यांना स्पर्श करून गेली. आज एक पोकळी निर्माण झाली आहे… जी कधीही भरून निघणार नाही.”
धर्मेंद्र आजारी असताना देखील बिग बी स्वतः गाडी चालवत त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्या अंतिम यात्रेलाही अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक पोहोचले होते.
दोघांनी मिळून 23 चित्रपट केले, जे अनेकदा ब्लॉकबस्टर ठरले. पण पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात जय-वीरू म्हणूनच त्यांची जोडी जिवंत राहिली.
धर्मेंद्र यांच्या निधनाने ‘शोले’चा वीरू खऱ्या अर्थानं शांत झाला आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्या सोबत होता, पण चित्रपट रिलीज होण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. धर्मेंद्र यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांची ही भावनिक श्रद्धांजली त्यांची मैत्री कशी होती हे सांगून जाते.