

Dharmendra Last Post Viral: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी, 89 व्या वर्षी, दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. कुटुंबीयांकडून अधिकृत निवेदन अद्याप आलेले नाही. त्यांच्या जाण्याने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून श्रद्धांजलीचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, धर्मेंद्र यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट आता जोरदार व्हायरल झाली आहे. निधनाच्या काही दिवस आधी त्यांनी आपला पुढील चित्रपट ‘इक्कीस’चा ट्रेलर इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्ती नंदा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
धर्मेंद्र यांनी 29 ऑक्टोबर 2025 रोजी पोस्ट करताना लिहिले होते—
“वो इक्कीस का था, इक्कीस का ही रहेगा!” या पोस्टसोबत त्यांनी सांगितले की ‘इक्कीस’ हा भारताच्या सर्वात तरुण परमवीर चक्र पुरस्कार विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या शौर्यकथेतून प्रेरित चित्रपट आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित हा चित्रपट मॅडॉक फिल्म्स आणि दिनेश विजन यांनी निर्मित केला आहे.
आपल्या चाहत्यांना आवाहन करत त्यांनी “आपला #QissaAtIkkis शेअर करा, कारण प्रत्येक कथा तरुण वयापासून सुरू होते,” असेही लिहिले होते. ख्रिसमस 2025 ला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची ही शेवटची पोस्ट चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरत आहे. एका दिग्गज कलाकाराच्या प्रवासाचा हा भावनिक शेवट असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.