

सध्या राज्यात शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीविरोधात वातावरण तापले आहे. या सक्तीविरोधात मराठी राजकारणी आणि सेलिब्रिटी चांगलेच भडकले आहेत. राज्यात मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांच्या पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही भाषा शिकावी लागणार आहे.
त्यामुळे इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याला राज्यभर विरोध होतो आहे. यावर काही कलाकार अत्यंत परखडपणे व्यक्त होतो आहे. अभिनेता वैभव मांगले याबाबत बोलताना म्हणतो, ‘ उर्वरीत महाराष्ट्रच मला माहीत नाही . पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे .. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलाव लागत हा एक भाग. दुसरं म्हणजे आपल्या आपल्यात सुद्धा त्यांना मराठी बोलायची लाज वाटते. आप ली मुलं चांगल मराठी बोलायचं विसरून गेली आहेत. त्यात हिंदीची सक्ती केली तर संपलच सगळं मातृभाषेची ( मुळात आई मराठी बोलत असले तर ) भिकारणीची अवस्था होईल. आता तर खेडो पाडी इंग्रजी शाळा झाल्या आहेत.
मुंबई पुणे येथे अनेक शाळा मध्ये मराठी शिकवीत नाहीत . मुलांशी घरात इंग्रजी बोला सांगतात. आई बाबा ला धड इंग्रजी येत नाही .. शाळेत शिक्षकांचं जे ऐकतील ते ( शिक्षक तरी किती चांगलं बोलतील ) त्यामुळे धड इंग्रजी नाही धड मराठी नाही .. त्यात बोली भाषा वेगवेगळ्या , पुन्हा शाळेत प्रमाण भाषा शिका . त्याचा वेगळा ताप . आई खिमट म्हणते आणि शाळेत मऊभात म्हणा म्हणतात.. मी उबारलायस म्हणतो शाळेत उभा राहिला आहेस म्हणतात. “माझ्या वांगडा चल “म्हणतो तर शाळेत माझ्या बरोबर चल म्हणा म्हणतात.
ही त्या बालमनाला संकट वाटतात. तर अजून हिंदी (राष्ट्रभाषा म्हणतात तिला )जोडीला आणून बसवली तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा . आपण आपल्या भाषेची कमालीची भीषण अवस्था केली आहे .तिच्या बद्दल कमालीचा अनादर आहे.’
कामाच्या ठिकाणीही मराठीची कशी गळचेपी होते याबाबत बोलताना ते म्हणतात, आम्हाला तर सिरियल ला स्क्रिप्ट सुद्धा मराठीत देत नाहीत ( अनेक ठिकाणी ) तर इतर ठिकाणी जिथे हिंदी भाषिक इंग्रजाळलेले लोक आपली काय पत्रास ठेवतात ते आपण पाहतो आहोत .हिंदी पहिली पासून येईल न येईल हा माझ्या साठीच नंतरचा मुद्दा आहे .. येणार ही नाही कदाचित पण म्हणून आपलं मराठी भाषेबद्दलच प्रेम वाढणार आहे का ?? आपण आपल्या मुलांच मराठी चांगलं होण्यासाठी अधिक सजग होणार आहोत का ?. मुळात आपण मराठीत बोलणार आहोत का ????
वैभवच्या या पोस्टवर अनेकांनी मराठीवर होत असलेल्या हिंदीच्या अतिक्रमणाविषयी चिंता व्यक्त केली आहे.