

Hindi Language Compulsion Row
मुंबई : हिंदी सक्तीविरोधात मुंबईत निघणाऱ्या मोर्चासाठी ५ जुलैची तारीख ठरली आहे. हा एकच मोर्चा निघणार असून त्यात मराठीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र सहभागी होतील. एकच मोर्चा निघणे हे सकारात्मक पाऊल आहे. हा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र २.० ची आठवण करुन देणार असेल. हा राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, राजकीयदृष्ट्या ते एकत्र येणार की नाही याचा निर्णय ते घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठीसाठी एकत्र येत आहोत. राज ठाकरेंनी मराठी भाषेसाठी पुढाकार घेतला आहे. त्याला उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला आहे. भाजपसह मराठा भाषेविषयी ज्यांना ज्यांना प्रेम आहे त्यांना या मोर्चासाठी निमंत्रण देणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
मोर्चासाठी ५ तारीख ठरली आहे. यात सर्व राजकीय पक्ष, कलाकार, साहित्यिक सहभागी होतील. मराठी माणसांची ताकद काय आहे? हा संदेश जाणे गरजेचे आहे. मराठीसाठी जेलमध्ये जाण्याची आमची तयारी असल्याचा इशारा त्यांनी दिला.
राज यांनी संजय राऊत यांना कॉल केला. त्यानुसार ५ तारीख ठरली. राज ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन राऊत यांना कॉल केला. राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला आणि उद्धव ठाकरे यांनी त्याला होकार दिला. ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांना औषध देऊ. हा मोर्चा राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांचा नाही तर मराठी माणसांचा मोर्चा आहे. त्याच नेतृत्व मराठी माणूस करतील. मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी काही लोक प्रयत्न करू शकतात. इतिहासाची पुनवृत्ती असणारा हा मोर्चा असेल, असे देशपांडे यांनी सांगितले.
मराठी माणूस दुधखुळा नाही. मराठी भाषेवर उपकार केले असे वाटतं असेल तर गुजराती भाषेला अभिजात दर्जा देऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
दादा भुसे यांच्या वक्तव्यांवर बोलताना ते म्हणाले की, खोट बोला पण रेटून बोला. असे ते सांगताहेत.
यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी, ठाकरे बंधू मनाने एकत्र आलेलेच असल्याचे म्हटले. मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूचा एकत्र मोर्चा निघणार असल्याचे सांगत त्यांनी या लढ्याचे नेृत्तत्व ठाकरेंनाच करावेच लागेल, असे सूचित केले.