

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणूक रिंगणात उद्धव आणि राज हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता अद्याप चर्चेच्याही पातळीवर पोहोचली नसली तरी हिंदी सक्तीच्या विरोधात पुढील आठवड्यात मुंबईत निघणार्या सर्वपक्षीय मोर्चात हे बंधू एकत्र येण्याची चिन्हे आहेत. मराठीच्या मुद्द्यावर एकच मोर्चा निघावा, अशी भूमिका घेत उद्धव आणि त्यांच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करणार असल्याचे राज यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा निघणार असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत गुरुवारी जाहीर केले होते. तत्पूर्वीच मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या त्रिभाषा सूत्रविरोधी समन्वय समितीनेही 7 जुलै रोजी मोर्चा जाहीर केला.
या मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दीपक पवार यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानंतर राज यांनी मनसेच्या मोर्चाची तारीख 6 जुलैऐवजी 5 जुलै शनिवार अशी केली आणि दोन मोर्चे निघण्याऐवजी एकच मोर्चा मराठीच्या मुद्यावर निघावा, अशी भूमिका मांडली. तसा प्रस्ताव उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांना दिला जाईल आणि त्यांच्याशी आमचे नेते बोलतील. उद्धव ठाकरे यांनीही या मोर्चात सहभागी व्हावे यासाठी मी त्यांच्यासोबतही बोलेन असे राज ठाकरे म्हणाले.
आता 5 जुलैच्या मोर्चाबद्दल ठाकरे बंधूंमध्ये चर्चा कधी होते आणि त्यास उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतात याबद्दल सर्वत्र कुतूहल आहे. या मोर्चात दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे बंधूंची युती होण्याच्या दिशेने पडलेले ते पहिले पाऊल ठरेल. शिवाय आपला पूर्वघोषित 7 जुलैचा मुहूर्त रद्द करून त्रिभाषा सूत्र विरोधी समिती राज ठाकरेंचा 5 जुलैचा मुहूर्त मान्य करते का हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून सरकारची हिंदीबद्दलची भूमिका मांडली. त्यावर राज म्हणाले, काही प्रश्नांची उत्तरे भुसेंकडे नव्हती. हा एक कट आहे. माझा विरोध काल होता, आज आहे आणि कायम राहणार. हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे राज यांनी भुसे भेटीनंतरही जाहीर केले.