

'लागिरं झालं जीमध्ये विक्रम राऊत, तर कारभारी लयभारी या मालिकेत राजवीर सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता निखिल चव्हाण आता नव्या चित्रपटात दिसणार आहे. निखिलचा अबीर नावाचा नवा मराठी चित्रपट येतोय. याआधी त्याने, 'अत्याचार', 'गर्ल्स', 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा', 'डार्लिंग', 'लंडन मिसळ', 'देवघर ऑन रेंट' तसेच 'वीरगती' आणि 'स्त्रिलिंग पुलिंग'मध्ये काम केलंय.
आता तो पायल जाधव आणि इतर कलाकारांसोबत अबीर चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येतोय. ग्रामीण मातीचा गंध, गावगाड्याची संस्कृती, कुटुंबातील ओलावा, भावनिक गुंतागुंत ‘अबीर’मध्ये पाहायला मिळणार आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट
हा चित्रपट १८ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. आता चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. सुदेश वसंतराव झावरे पाटील निर्मित तसेच शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन आकाश विष्णू शिंदे यांनी केले आहे.
काय आहे टीझरमध्ये?
टीझरची सुरुवात शांत वाहणारी नदी, नारळी-पोफळीच्या बागा आणि निसर्गरम्य गावाच्या दृश्यांनी होते. नदीकिनारी सुरू होणारा प्रवास, नावेतील सफर, गावची लगबग आणि विविध पात्रांची ओळख यातून एक जीवंत ग्रामीण विश्व समोर येते. मात्र या सुंदर पार्श्वभूमीमागे दडलेले अंतर्गत संघर्ष आणि नाट्यमय घटनांचे धागेदोरेही टीझरमध्ये जाणवतात.
विठुरायाची भक्ती आणि आयुष्यातील संकटे यांची गुंफण यात पाहायला मिळते. देवळात सुरू असलेली पूजा, आरतीचा उजेड आणि काळोखात कंदिलाच्या प्रकाशात दिसणारी एका स्त्रीची अस्वस्थता पाहायला मिळते.
निर्माते सुदेश वसंतराव झावरे पाटील म्हणाले, ‘अबीर’ हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून मानवी मनातील संवेदनशीलता, श्रद्धा आणि माणुसकीचा शोध घेणारा प्रवास आहे. विठ्ठलभक्तीतून मिळणारा समता, प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश या कथेच्या गाभ्याशी जोडलेला आहे. जात-पात वा भेदाभेदांच्या पलीकडे जात माणसातील चांगुलपणा आणि संस्कार जपण्याचा हा विचार गावाकडच्या प्रेक्षकांपासून वारकरी संप्रदायापर्यंत सर्वांनाच आपलासा वाटेल.
ही कथा केवळ एका गावाची किंवा ठराविक व्यक्तींची नसून मनातील भावना आणि नात्यांच्या विविध छटांचा प्रवास आहे. गावाकडची संस्कृती, श्रद्धा आणि नात्यांमधील गुंतागुंत प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रसंग, संवाद, पात्ररचना आणि कॅमेऱ्यातील प्रत्येक फ्रेम विचारपूर्वक रचली आहे. तांत्रिक बाबींपेक्षा प्रेक्षकांना तो अनुभव कसा जिवंत वाटेल यावर लक्ष केंद्रित केले आहे. टिझरमधून केवळ एक झलक दिली असून, कथेतील भावनिक खोली आणि अनपेक्षित वळणे पूर्ण चित्रपटात पाहायला मिळतील.
- आकाश विष्णू शिंदे, दिग्दर्शक
या चित्रपटात पायल जाधव, निखिल चव्हाण, देविका दफ्तरदार, अविनाश नारकर, गणेश देशमुख, प्राजक्ता हनमघर, गार्गी फुले, यश डिंबळे, रोशन सुनील राऊत, प्रशांत नेटके, गायत्री सुदेश झावरे, रेखा दहातोंडे, राजवर्धन झावरे आणि साईराज केंद्रे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचीही खास भूमिका पाहायला मिळणार आहे.
छायांकन निशांत भागवत, सहदिग्दर्शन अमित खंडागळे व सचिन नागरे, संकलन निलेश गावंड, संगीत व पार्श्वसंगीत रोहित नागभिडे (गायिका आर्या आंबेकर, वैशाली माडे, राधा खुडे), रंगभूषा सुजित सुरवसे, वेशभूषा स्नेहल नार्वेकर, कला दिग्दर्शन महेश गोरे, ध्वनी संयोजन विकास खंदारे आणि ध्वनी संकलन स्वरूप जोशी यांचा समावेश आहे. प्रॉडक्शन विष्णू घोरपडे, मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माता, अभय वाव्हळ व युवराज कुमार इंगवले प्रोजेक्ट हेड आणि प्रतिभा चव्हाण लाईन प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहेत.