

Aamne Saamne natak Neela Bhagwat clarify fees: मराठी रंगभूमीवरील गाजलेलं नाटक आमने सामने यातील तरूण कलाकार रोहन गुजर आणि केतकी विलास यांनी मानधन वाढीवरून निर्मात्यांशी वाद झाल्यानंतर त्यांनी आम्हाला तडकाफडकी काढून टाकलं अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.
आता त्याला काऊंटर म्हणून नाटकातील अनुभवी कलाकार नीला भागवत आणि मंगेश कदम यांनी देखील एक व्हिडिओ पोस्ट करत आपली बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी मानधन वाढीबाबत रोहन आणि केतकी यांच्याशी काय बोलणं झालं होतं अन् ती कितवी मानधन वाढ होती याबाबतचा खुलासा केला. हे दोघेही या नाटकाचे सहनिर्माते देखील आहेत.
व्हिडिओ पोस्ट करताना नीला भागवत यांनी त्याला नाण्याची दुसरी बाजू असं कॅप्शन दिलं आहे. त्या आपल्या व्हिडिओत सांगतात की त्या या नाटकाच्या कलाकार आणि सहनिर्माते देखील आहेत. नीला भागवत म्हणाल्या, 'आमच्या सहकलाकारांनी काल जो व्हिडिओ पोस्ट केला तो आम्ही पाहिला. दिवसभर त्याच्यावरील प्रतिक्रिया देखील पाहिल्या. त्यानंतर आम्हाला आमची बाजू मांडावी असं वाटलं.'
त्या पुढे म्हणाल्या की, व्हिडिओत मानधन वाढवून मागितलं म्हणून निर्मात्यांनी आम्हाला नाटकातून तडकाफडकी काढून टाकलं असा सूर दिसतोय. मात्र यात एक शब्द राहून गेला आहे तो म्हणजे तिसऱ्यांदा मानधन वाढवून मागितलं असा आहे. ज्यावेळी त्यांच्याकडून पहिल्यांदा मानधन वाढवण्याचा प्रस्ताव आला होता त्यावेळी तो अत्यंत मामुली होती. त्यावेळी नाटक देखील एवढं फॉर्ममध्ये आलं नव्हतं. आम्ही तो मानधन वाढीचा प्रस्ताव मान्य केला.
नीला यांनी ज्यावेळी नाटक चांगलं चालायला लागलं त्यानंतर चार ते पाच महिन्यातच पुन्हा मानधन वाढीचा प्रस्ताव आला. त्यानंतर मंगेश कदम म्हणाले की, ज्यावेळी त्यांच्याकडून मानधन वाढीचा प्रस्ताव आला त्यावेळी मीच त्यांच्याशी बोललो मी दोघांनाही अपेक्षा विचारली होती. त्यांनी ज्या अपेक्षा सांगितल्या होत्या त्या आम्ही लगेचच मान्य केल्या होत्या.
नीला यांनी याबाबतचे सर्व मेसेजेस आमच्याकडे आहेत असं देखील सांगितलं. त्यानंतर पुन्हा नाटक सुरू झालं अन् वर्ष होण्याच्या आत पुन्हा कॅनडा दौऱ्यावर तिसऱ्यांदा मानधन वाढीचा प्रस्ताव आला. मंगेश कदम यांनी सांगितलं की वर्षाच्या आतच मानधन वाढीचा प्रस्ताव आल्यावर मला जरा धक्का बसला.
नीला यांनी स्पष्ट केलं की या प्रस्तावावेळी त्यांनी ही मानधनवाढ आम्हाला प्रत्येक वर्षी हवी आहे असं सांगण्यात आलं. मराठी नाट्यसृष्टीतील एखाद्या निर्मात्याला एखाद्या नाटकातील कलाकारांना दर वर्षी मानधनवाढ देणे शक्य होईल की नाही आम्हाला माहिती नाही. मात्र आम्हाला ते शक्य नव्हतं. त्यामुळे आम्हाला त्यांना जे अपेक्षित मानधन हवं आहे ते न देता त्यांच्याकडून काम करून घेणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही त्यांना थांबवलं.
नीला भागवत यांनी यापुढे या विषयावर आमच्याकडून कोणताही व्हिडिओ किंवा पोस्ट येणार नाही असं देखील स्पष्ट केलं.