Madhuban Controversy : सनी लिओनीचा ‘तो’ व्हिडिओ हटवणार | पुढारी

Madhuban Controversy : सनी लिओनीचा 'तो' व्हिडिओ हटवणार

पुढारी ऑनलाईन डेस्क

Madhuban Controversy – ‘मधुबन मे राधिका’ ( Madhuban mein Radhika) या गाण्याला तीव्र विरोध झाल्यानंतर हे गाणे रिप्लेस करण्याचा निर्णय म्युझिक कंपनीने घेतला आहे. १९६० मधील कोहिनूर चित्रपटातील ‘मधुबन मे राधिका’ (Madhuban mein Radhika) गाणं होते. या गाण्‍याचा रिमेक अभिनेत्री सनी लिओनी आणि संगीतकार शारिब तोशी यांनी केला आहे. सनी लिओनीवर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यामुळे वाद निर्माण झाला. हे गाणे हटवावे, अशी मागणी होऊ लागली. सनी लिओनी हिने तीन दिवसांमध्‍ये वादग्रस्‍त ‘मधुबन में राधिका नाचे’ हा म्‍युझिक व्‍हिडिओ हटवावा. तसेच माफी मागावी अन्‍यथा त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मध्‍य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिला होता.(Madhuban Controversy)

मध्‍य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ट्‍विट केले होते की, काही लोक सातत्‍याने हिंदू धर्मांच्‍या भावना दुखावत आहेत. हा व्‍हिडिओ ही असाच प्रकार आहे. भारतात राधेची पूजा केली जाते. साकिब तोशी यांनी आमच्‍या धर्माच्‍या भावना दुखावल्‍या जातील अशी गाण्‍याची निर्मिती करु नये. सनी लिओनी आणि शारिब तोशी यांनी तीन दिवसांमध्‍ये हा व्‍हिडिओ हटवून माफी मागावी. अन्‍यथा आम्‍ही कायदेशीर कारवाई करु.

व्‍हिडिओमधील गाणं कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे. तर कोरिआग्राफी गणेश आचार्य यांनी केले आहे. २२ डिसेंबरला हा व्‍हिडिओ यू-ट्‍यूबवर रिलीज झाला. याला काही दिवसांतच ९ कोटींहून अधिक व्‍ह्‍यूज मिळाले आहेत. काही नेटकर्‍यांनी या गाण्‍यावर आक्षेप घेतला. मथुरेतील काही पुजार्‍यांनीही या गाण्‍यावर बंदी घालण्‍यात यावी, अशी मागणी केलीय. सरकारने याविरोधात कारवाई केली नाही तर न्‍यायालयात जाण्‍याचा इशाराही पुजार्‍यांनी दिला.

तीव्र नाराजी आणि विरोधानंतर म्युझिक कंपनीने एक ऑफिशियल स्टेटमेंट ट्विटरवर जारी केलंय. सारेगामाने हे स्टेटमेंट आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जारी केलं आहे. ट्विटमध्ये म्हटलंय-‘देशवासीयांचे फीडबॅक आणि त्यांच्या भावनांचा सन्मान करत आम्ही हा निर्णय घेतला आहे की-‘मधुबन’ गाण्याचे लिरिक्स आणि नाव तीन दिवसांच्या आत बदलले जाईल. पुढील ३ दिवसांच्या आत नवं गाणं रिप्लेस करण्यात येईल. सारेगामाने हे गाणे आपल्या यू-ट्यूब चॅनलवर २२ डिसेंबर रोजी रिलीज केलं होतं. तेव्हापासून या गाण्यावरून वाद निर्माण झाला.

 

Back to top button