Zindagani : छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘जिंदगानी’ च्या पोस्टरचे अनावरण | पुढारी

Zindagani : छगन भुजबळ यांच्या हस्ते 'जिंदगानी' च्या पोस्टरचे अनावरण

मुंबई; पुढारी ऑनलाईन: ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘जिंदगांनी’ ( Zindagani ) चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण करत चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. मराठी चित्रपट हा नेहमीच प्रगल्भ राहिला असून मराठी चित्रपटातुन मांडण्यात येणारे विषय हे नेहमीच समाजाला आरसा दाखवत आले आहेत. असाच एक सामाजिक विषय मांडणारा चित्रपट म्हणजे, ‘जिंदगांनी’ होय.

नाशिक येथे चालू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘जिंदगांनी’ चित्रपटाचे पोस्टरचे सन्माननीय कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘जिंदगानी’ या पोस्टर अनावरण सोहळ्यात छगन भुजबळ म्हणाले की, ‘एका वेगळ्या विषयाचा आणि वेगळ्या आशयाचा हा चित्रपट असून अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात याचा गौरव झाला आहे. नाशिकचे स्थानिक कलाकार आणि येथील तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्याचा गौरव करण्यासाठी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघायला हवा’. असे म्हटले.

या पोस्टर अनावरण सोहळ्यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. ‘जिंदगानी’ हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. बदलणाऱ्या काळात आपण सुद्धा बदलत असलो तरी आपलं मूळ हे नेहमीच लक्षात ठेवायचं असा संदेश देणाऱ्या या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन विनायक साळवे यांनी तर निर्मिती सुनीता शिंदे यांनी केली आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रयोगशील नट म्हणून ओळखले जाणारे शशांक शेंडे तर नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे दिसणार आहे. शशांक आणि वैष्णवीसोबत सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, विनायक साळवे, प्रदिप नवले, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती हे कलाकार या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.

विजय गवंडे यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. तर चित्रपटातील गाणी अजय गोगावले, आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे, अमिता घुगरी यांच्या सुरमधुर स्वरांनी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button