रंकाळा सुशोभीकरणासाठी मनपा हिश्श्याची रक्कमही शासन देणार | पुढारी

रंकाळा सुशोभीकरणासाठी मनपा हिश्श्याची रक्कमही शासन देणार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 कोटी 84 लाखांचा निधी मंजूर केला. परंतु सुशोभीकरण प्रकल्प खर्चाचा राज्य शासन व महानगरपालिका यांचा 75 : 25 हिस्सा अशी अट शासन निर्णयात होती. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता 25 टक्के हिस्स्याचा खर्च प्रशासनाच्या आवाक्याबाहेरील आहे. परिणामी, मंजूर निधीचा 100 टक्के हिस्सा शासनाने द्यावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे केली. क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. रंकाळा सुशोभीकरणास मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील निधीचा 100 टक्के हिस्सा राज्य शासन देण्यास मंजुरी मिळाली आहे.

गेली अनेक वर्षे दुर्लक्षित झालेल्या रंकाळा तलावास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी केलेल्या मागणीनुसार, ऑक्टोबरमध्ये कोल्हापूर दौर्‍यावर असताना नगरविकास मंत्री शिंदे यांनी 15 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून 9 कोटी 84 लाख महापालिका प्रशासनाला तत्काळ दिले आहेत.

आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी 25 टक्के हिस्सा देण्यास महापालिका प्रशासन असमर्थ असल्याचे क्षीरसागर यांना सांगितले. क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाची आर्थिक परिस्थिती दयनीय असल्याने मंजूर निधी परत जाऊ नये व रंकाळा तलावाचे सुशोभीकरण प्रलंबित राहू नये, यासाठी मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील 100 टक्के हिस्सा राज्य शासनाने द्यावा, अशी मागणी मंत्री शिंदे यांच्याकडे केली. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार शासनाने मंजूर केलेल्या निधीचा 100 टक्के हिस्सा देण्यास नगरविकास विभागाने मान्य केले आहे.

उर्वरित 5 कोटी लवकरच : क्षीरसागर

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रश्न प्रलंबित राहू नये, यासाठी नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला.

दुसर्‍या टप्प्यातील उर्वरित 5 कोटींचा निधीही तत्काळ मंजूर करून त्यातही 100 टक्के हिस्सा राज्य शासनाकडून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, माजी जिल्हाप्रमुख रवि चौगुले, दीपक गौड, माजी नगरसेवक राजू हुंबे उपस्थित होते.

Back to top button