पुढारी ऑनलाईन डेस्क : ॲण्ड टीव्हीवरील नवीन मालिका 'अटल'ने दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बालपणीच्या उजेडात न आलेल्या कथा सादर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तरुण वयातील अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारत असलेल्या व्योम ठक्करचे भरभरून कौतुक केले जात आहे. (Atal Serial ) तसेच मालिकेमधील इतर प्रमुख कलाकारांची देखील प्रशंसा केली जात आहे. वाजपेयी कुटुंबातील उर्मिला व कमला यांची भूमिका साकारणाऱ्या अलिना व अलिन जैस्वाल यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Atal Serial )
संबंधित बातम्या –
या जुळ्या बहिणी या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत आणि या प्रवासाचा भाग असल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे. त्या साकारत असलेल्या वाजपेयी कुटुंबातील तरुण सदस्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकांना कथानकामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. विशेषत: त्यांचे यंग अटलसोबत प्रेमळ नाते आहे.
मालिकेमध्ये उर्मिला बिहारी वाजपेयीची भूमिका साकारण्याबाबत आपला आनंद व्यक्त करत अलिना जैस्वाल म्हणाली, "मला या मालिकेचा भाग असण्याचा आणि माझी बहीण व इतर कलाकारांसोबत काम करण्याचा आनंद होत आहे. माझ्या जुळ्या बहिणीसोबत शूटिंग करण्याचा अनुभव अद्भुत आहे, जेथे मी माझ्या वास्तविक जीवनातील बहिणीसोबत ऑन-स्क्रिन बहिणीची भूमिका साकारत आहे. आम्ही दोघी एकत्र खूप धमाल करतो आणि ती आसपास असताना वातावरण खूप उत्साहपूर्ण असते. तिच्याव्यतिरिक्त मी व्योम (अटल) आणि माझी मालिकेमधील आई नेहा जोशी यांच्यासोबत काम करण्याचा आनंद घेत आहे.
नेहा जोशी मला खूप मदत देखील करतात." मालिकेमध्ये कमला बिहारी वाजपेयीची भूमिका साकारण्याबाबत अलिन जैस्वाल म्हणाली, "मला माझ्या जुळ्या बहिणीसोबत या मालिकेचा भाग असण्याचा आनंद होत आहे. शाळा सुटल्यानंतर अलिना आणि मी थेट शूटिंगला जातो. सेटवरील संपूर्ण टीम, विशेषत: आमचे दिग्दर्शक खूप मदत करतात. अलिना आणि मी प्रेक्षकांना आमच्या भूमिकांवर प्रेम व पाठिंब्याचा वर्षाव करण्याची विनंती करते. मी या अद्भुत संधीसाठी निर्मात्यांचे आभार मानते."