Animal Movie Review : पौरुषत्वाचा विखार, स्वस्तातले खून आणि स्त्रीचा उपभोग | पुढारी

Animal Movie Review : पौरुषत्वाचा विखार, स्वस्तातले खून आणि स्त्रीचा उपभोग

संकेत सबनीस, मुक्त पत्रकार

अॅनिमल या चित्रपटाची कोटीच्या-कोटी उड्डाणं, त्यातल्या भरपूर हत्या, अनेक सेक्स सीन्स आणि इतर बऱ्याच चर्चांचा धुरळा अजूनही हवेत भिरभिरतोय. अॅनिमलने हवेत भिरकावलेली ही धूळ खाली बसण्याआधीच त्याचा अन्वयार्थ लावणं आवश्यक आहे. कथा नसलेला अर्थहीन हाणामारीपट. सिनेमासारखं चांगलं बिरुद लावण्याऐवजी हाणामारीपट हेच बिरुद या ३ तास २१ मिनिटांच्या मोठ्या व्हिडिओला सार्थ ठरेल. कारण, हल्लीच्या बहुतांश बॉलिवूडपटांसारखी अॅनिमलचीही गत झाली आहे. (Animal Movie Review ) कथा नसली की खून, माऱ्यामाऱ्या, महिलांसोबतचे किसिंग सीन्स, सेक्स सीन्स यावर संपूर्ण पिक्चर ओढून न्यायचा. अधे-मध्ये महागड्या सेट्सवरची गाणी पेरायची आणि यावरच पिक्चरचा प्रोमो तयार करून बाजारपेठेत उतरायचं. सोबतीला मोठे अभिनेते, अभिनेत्री यांची फौज ठेवायची. मग काय, विकेंडला मित्र-मंडळी, नातेवाईकांसोबत चांगल्या चित्रपटाच्या शोधात असलेल्या तरुणाईला प्रोमोच्या जाळ्यात ओढायचं आणि गल्ला करायचा. मग, आपणच या पिक्चरचा एवढा गल्ला झाला, एका आठवड्यात ५०० कोटी वसूल अशा बातम्या पाहायच्या. अक्षरश: या सगळ्याची प्रचिती अॅनिमल पाहिल्यावर येते. (Animal Movie Review )

सतत महिलांशी चुंबन किंवा इंटिमेट सीन दाखवून आणि त्यांना कसपटासमान वागणूक देणाऱ्या या मोठ्या व्हिडिओत सिनेमा दिसत नाही. २१ व्या शतकात स्त्री – पुरुष समानतेची सतत चर्चा होत असताना असे चित्रपट समाजाला पुन्हा मूळपदावर आणून ठेवताना दिसतात. नवख्या तरुणांना खिशात पैसा आला की, असंच वागायचं असतं हा संदेशही यातून जातो. आपल्या सेन्सॉर बोर्डाचं काम हे फक्त न पटणारी राजकीय विचारधारा किंवा धार्मिक संदर्भांवर आक्षेप घेण्यापुरतंच आहे का? हा प्रश्नही उमटतो.

अभिनेता रणबीर कपूरचा सध्या अॅनिमल हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित अॅनिमल या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, अभिनेते शक्ती कपूर, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आठवडाभराच्या आत अॅनिमलने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिकचा गल्ला केल्याची चर्चा आहे. पण, क्राईम ड्रामा दाखवण्याच्या नादात निव्वळ हिंसाचार दाखवला गेलाय. चित्रपटात मारामाऱ्या, खून, इंटिमेट सीन असण्याबद्दल काहीच दुमत नाही. मात्र, ते कथेच्या मागणीनुसार यावं. त्यावरच भर देऊन सिनेमाच्या नावाखाली मोठे व्हीडिओ बनवण्यात काय हशिल? अॅनिमलधला नायक रणबीर कपूर (रणविजय सिंग) हा पैशाच्या बळावर हिंसा आणि दहशत माजवणारा, एकामागोमाग एक ३०० खून एकाच सीनमध्ये घडवून आणणारा आणि त्यासाठी बंदुका, तोफांनी जडलेली बाईक वापरणारा दाखवला गेलाय. उठसूठ पत्नीसोबत शरीर किंवा लैंगिक विषयाभोवती चर्चा करणं. तसंच तो तिला सतत कमी लेखतानाही दिसतो. त्याचे वडील बलबीर सिंग (अनिल कपूर) हे कामात व्यस्त, कुटुंबाकडे लक्ष नसलेले उद्योगपती आणि स्वभावाने तापट दाखवण्यात आले आहेत. कायमच वडिलांकडून दुजाभाव आणि हेटाळणीची वागणूक मिळूनही आणि त्यांच्याकडून मार खाऊनही रणविजयच्या (रणबीर कपूर) मनात त्यांच्याबद्दलचा आदर कायम राहतो. मात्र, यात स्वभावाने आक्रमक झालेला रणविजय घरी आलेल्या मुख्यमंत्र्यांशी नीट न वागणं, वडिलांशी वाद करणं असे प्रकार सतत करत असतो.

अखेर वडील त्याला घरातून बाहेर काढतात. त्याच दिवशी तो शाळेतली मैत्रीण गितांजलीला (रश्मिका मंदाना) घेऊन घरातून निघतो आणि अमेरिकेला जातो. तिकडून तो थेट ८ वर्षांनी मुला-बाळांसह घरी परततो. त्याला कारण ठरतं ते म्हणजे त्याच्या वडिलांवर झालेला गोळीबार. यात वडील बचावतात मात्र त्यांच्यावरच्या मूळ हल्लेखोरांचा बदला घेण्याच्या भूताने रणविजय पछाडतो आणि हिंसाचाराचा नंगानाच सुरू होतो. कॉलेजमध्ये असतानाच बहिणीचं रॅगिंग केलं म्हणून वर्गात रायफल घेऊन गोळीबार करणं आणि त्यानंतर आपल्या गाडीने रॅगिंग करणाऱ्यांना उडवणं टाकणं असले प्रकार ते करतो. त्याच्या अशा स्वभावातून चित्रपटात होणारा हिंसाचार हा अनाकलनीय वाटतो. त्याच्या हिंसाचाराला ना धरबंद ना लगाम.

३ तास २१ मिनिटांच्या या मोठ्या व्हीडिओमध्ये एवढा हिंसाचार होत असताना पोलीस फिरकतही नाहीत. आपल्या पर्सनॅलिटीसाठी रणबीरने शरीर कमावलंय त्याची हेअरस्टाईल त्याच्या ‘हॉट’ व्यक्तिमत्त्वाला साजेशी आहे. पण, संजू सिनेमामध्ये त्याने केलेली संजय दत्तची भूमिका अजूनही त्याच्यात दडलेली आहे हे अॅनिमलमधून दिसून येतं. रणबीरची पत्नी गितांजली (रश्मिका मंदाना) हिला त्याच्या अनेक गोष्टी पटत नसतानाही त्याच्यामागे-मागे थांबावं लागल्याचं दिसतं.

रणबीर कपूरप्रमाणे याचं दुसरं उदाहरण आहे चित्रपटात दहा मिनिटांसाठी येणारा अब्रार म्हणजेच बॉबी देओल. त्याची मुव्हीमधली एन्ट्री ही भयावह वाटावी अशीच आहे. त्याच्या तिसऱ्या लग्नातला सीन दाखवला गेलाय. या लग्नात त्याला एक जण त्याच्या भावाच्या हत्येची बातमी देतो. हा थेट त्याची निर्घृण हत्या करतो आणि आपल्या नव्या बायकोसोबत तिथेच शरीरसंबंध ठेवतो. एका महिलेचं शिलहनन करताना ती नववधू असून लग्नमंडपात नातेवाईकांसमोर बसलीय याची दखल न घेता सीन शूट करणं हे लाजिरवाणं वाटावं असंच आहे.

दिग्दर्शकाने रणबीर कपूरसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना (गितांजली) हिला नायिका म्हणून संधी दिली आहे. मात्र, तिच्या भाषेची अडचण संपूर्ण चित्रपटात जाणवत राहते. तिला हिंदी अजिबात येत नाही हे तिच्या डायलॉग्समधून सतत जाणवतं. सुरुवातीपासून रणबीरच्या कुटुंबियांच्या काहीसे विरोधात असलेले त्याचे पंजाबमधले चुलत भाऊ नंतर रणबीरच्या एकाच भेटीत त्याच्यासोबत जायला तयार होतात आणि नंतर रणबीरसोबत सगळ्या हिंसाचारात सहभागी होतात. अनेकांचे खून करतात. निव्वळ स्वॅग दाखवणाऱ्या या पंजाबी भावंडांचा चित्रपटात खून करण्यापलिकडे काहीच उपयोग दिसत नाही. पण त्यांच्यामुळे चित्रपटाला पंजाबी गाणी लाभली आहेत. यातली काही गाणी खरंच चांगली झाली आहेत.

बॉबी देओलचा चित्रपटात एन्ट्री करतानाचा सीन हा कधीच समर्थनीय असू शकत नाही. हे कृत्य करणाऱ्या खलनायकाच्या चित्रपटातल्या एन्ट्रीलाच हा सीन असणे आणि त्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सीनलाच त्याचा मारहाणीअंती मृत्यू होणे यातले संदर्भ लागत नाहीत. नायकाला आपण कुऱ्हाडीने ३०० लोकांचे खून घडवून आणतोय, याचं वैषम्य कधीच वाटत नाहीत. हे खून इतके स्वस्तात आणि सहज होत असतात की, ते पाहून एका ठराविक वेळेनंतर शिसारीच येते. मात्र, आपल्या वडिलांना वाचवण्याच्या नादात आपण अनेकांना संपवतो आहोत याचा त्या नायकाला कुठे तरी आत्मानंदच मिळत असतो. यादरम्यान, अवघ्या 5 मिनिटांची भूमिका असलेल्या उपेंद्र लिमयेनं चांगला अभिनय केलाय. अॅनिमल हे नाव का ठेवलं याचं उत्तर चित्रपट पाहणाऱ्याला लगेचच कळेल.

Back to top button