Graduate : पदवीनंतर काय? | पुढारी

Graduate : पदवीनंतर काय?

सतीश जाधव

महाविद्यालयीन जीवनात युवकांच्या स्वप्नांना धुमारे फुटतात. या स्वप्नांमध्येच कॉलेज जीवन संपते आणि आपण ‘पदवीधर’ (Graduate) होतो. मात्र, या टप्प्यावर खरा प्रश्न असतो तो ‘पुढे काय?’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल असंख्य पर्याय असतात. ते निवडताना खर्‍या अर्थाने आपला कस लागतो.

प्रवास : कॉलेज जीवनात मित्रांच्या गाठी-भेटी, प्रवास करणे, विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवणे यासारख्या गोष्टीतून स्वावलंबीपणा वाढत असतो. निर्णय घेण्याची क्षमताही याच काळात विकसित होत असते. मित्रांबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर किंवा एकट्याने प्रवास करण्याची तयारी ठेवली पाहिजे. यातून जगाची ओळख होते.

नोकरीचा शोध : पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही जण नोकरीचा शोध घेतात. जितक्या लवकर नोकरी लागेल, तितका लवकर अनुभव आपल्या पाठीशी राहतो. नोकरी केल्यामुळे आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो किंवा कोणते क्षेत्र आपल्यासाठी पूरक ठरेल, याचीही कल्पना लवकर येते. एखादा नवीन जॉब करताना अडचणी येत असतील तर आपण तो जॉब सोडून दुसरीकडे तत्काळ प्रयत्न करू शकतो. या गोष्टी जेव्हा शक्य आहेत, जेव्हा की पदवी पूर्ण झाल्यानंतर वेळ न घालवता नोकरी पाहू. नोकरीबरोबर आपण शिक्षणही घेऊ शकतो. ऑनलाईन, बहिस्थ अशा पर्यायातून आपण उच्च शिक्षण घेऊ शकतो आणि करिअरसाठी आपली वाटचाल अधिक सुकर होऊ शकते. (Graduate)

कार्यकर्ता : फावल्यावेळेत वाचन, फिरणे या गोष्टीबरोबरच सामाजिक उपक्रमात सहभाग होऊ शकतो. सामाजिक संघटनांशी संबंध आल्याने आपल्याला सामाजिक प्रश्नांची जाण होऊ शकते, त्याचबरोबर ते प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक पातळीवर कोणकोणते प्रयत्न होत आहेत, याकडेही आपण पाहू शकतो. अनेक शाळा आणि महाविद्यालयेदेखील सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात. आपत्कालीन स्थितीत मदत करणे, स्वच्छता मोहीम, झाडे लावण्याची मोहीम, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आखण्यात येणार्‍या उपायात सहभाग होणे आदी गोष्टींतून आपण सामाजिक जबाबदारी पेलू शकतो.

अनुभव : अनुभवातून आपण शिकतो आणि त्याप्रमाणे वाटचाल करत असतो. कॉलेज विश्व आणि वास्तवातील विश्व यातील फरक आपल्याला अनुभवातून येतो. नोकरी करताना, सामाजिक उपक्रमात सहभागी होताना, कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होताना, प्रवासात, पर्यटन करताना अशा अनेक मार्गांतून अनुभव येत असतात. हा अनुभव आपल्याला कोणत्याही क्षणी उपयोगी पडू शकतो. (Graduate)

उद्योगाचा श्रीगणेशा : उद्योग-व्यवसायात रूची असणारे युवक हे नवीन उद्योग उभारणीकडे आकर्षित होतात. वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारीही कॉलेज जीवनानंतर युवकावर येते. सरकारकडून आज नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले जात आहे. अशावेळी संधीचा फायदा घेत युवक उद्योग सुरू करू शकतात. साचेबद्ध नोकरीपेक्षा काहींचा कल उद्योगाकडे असतो; परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने ते धाडस करत नाहीत.

स्वत:ला तयार करा : आपली पात्रता आणि करिअरसाठी लागणारा वेळ यावर विचार करून वाटचाल निश्चित केली पाहिजे. गरज पडल्यास मित्रांशी, सरांशी आणि पालकांशी चर्चा करायला हवी. आपल्याला कोणता जॉब किंवा उद्योग योग्य ठरेल, याचा आरखडा तयार केला पाहिजे. आपल्या कौशल्याचा वापर करिअरसाठी केल्यास आव्हाने पेलण्यास लवकरच तयार होऊ शकतो. जो व्यक्ती स्वत:ला जेवढे लवकर ओळखतो तोच जगालाही लवकर ओळखू शकतो. व्यक्तिमत्त्व, संभाषण कौशल्य, नम्रता या गोष्टी विकसित केल्यास करिअरमधील अडचणी कमी होतात.

Back to top button