दिवाळीच्या मुहूर्तावर ‘Aai Kuthe Kay Karte’ मध्ये नव्या पात्राची होणार एन्ट्री | पुढारी

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘Aai Kuthe Kay Karte’ मध्ये नव्या पात्राची होणार एन्ट्री

मुंबई; पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ( Aai Kuthe Kay Karte) मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत दिवाळीच्या मुहूर्तावर मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. अभिनेता ओंकार गोवर्धन हा मालिकेत ‘आशुतोष’ची भूमिका साकारणार आहे.

‘आई कुठे काय करते’ ( Aai Kuthe Kay Karte) मालिकेत अविनाशला पैशांची मदत करण्यासाठी अरुंधतीने समृद्धी बंगला गहाण ठेवला आहे. ही गोष्ट देशमुख कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येकाकडूनच उलट -सुलट प्रतिक्रिया मिळाल्या. अनिरुद्ध आणि संजनाने तर समृद्धी बंगला विकण्यासाठीचा प्रस्ताव मांडला. मात्र, या कठीण प्रसंगातही खचून न जाता अरुंधतीने ठामपणे उभं रहायचं ठरवलं आहे.

घरात एकीकडे तणावाचं वातावरण असताना मालिकेत लवकरच एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. ‘आशुतोष’ असं या नव्या पात्राचं नाव असून अभिनेता ओंकार गोवर्धन याने ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेजमधला मित्र असून तो एक यशस्वी बिझनेसमन आहे. बऱ्याच वर्षांनंतर अरुंधती आणि आशुतोषची एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होणार आहे.

ओंकार गोवर्धन ‘आशुतोष’ची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूपच उत्सुक असून ‘आई कुठे काय करते’ या कुटुंबाचा भाग होण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्याने व्यक्त केला आहे. यात त्याने ”आई कुठे काय करते’ ही मालिका गेली दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतलं प्रत्येक पात्र लोकप्रिय झालं आहे.

त्यामुळे ‘आशुतोष’ ही व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी जबाबदारीचं आणि तितकंच आव्हानात्मक आहे. हे पात्रं मला अतिशय आवडलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर माझी ‘आई कुठे काय करते’ मालिकेत एन्ट्री होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे’ असे ओंकारने म्हटले आहे.

आशुतोष या पात्राच्या एन्ट्रीने मालिकेतही नवं वळण येणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘आई कुठे काय करते’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button