‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर दोन दिग्गज कलाकारांची एन्ट्री होणार | पुढारी

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर दोन दिग्गज कलाकारांची एन्ट्री होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जनसामान्यांचा कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड हे हॉट सीटवर येणार आहेत.

प्रशांत दामले आणि कविता लाड ‘कोण होणार करोडपती’चा खेळ अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसाठी खेळले आहेत. ते स्वतः अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आहेत. मराठी नाटकांच्या भविष्यासाठी ते ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. ह्या विशेष भागाची सुरुवात प्रशांत दामले त्यांच्या ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाण्याने झाली आहे. त्यामुळे मंचावर एकदम वेगळेच वातावरण तयार झाले.

प्रशांत दामले आणि कविता लाड हे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर व्यक्त झाले. प्रशांत दामले काही ठराविक नाट्यगृहांत प्रयोग का करत नाहीत, याबद्दल त्यांनी सांगितले. प्रशांत दामले यांनी मोरूची मावशी नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला. सुरुवातीला १६१ प्रयोग होईपर्यंत हे नाटक रंगभूमीवर विशेष गाजले नव्हते. त्यानंतर दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी त्यातील गाणे सादर केले. ते गाणे प्रेक्षकांना इतके आवडले की त्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यापुढील आजपर्यंतचे सगळे प्रयोग हाऊसफूल गेले, अशी आठवण प्रशांत दामले यांनी सांगितली.

कविता लाड यांनी प्रशांत दामले यांच्या कामाचे फार कौतुक केले. त्यांच्यासारखा नट रंगभूमीवर सतत काम करतो आहे, त्यामुळे सगळ्यांनाच कामाचा हुरूप येतो. प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी भरपूर वर्षे एकत्र काम केले आहे. आजवरच्या कारकिर्दीत झालेल्या अनेक आठवणी आज या मंचावर उलगडणार आहेत. अनेक नाटकांदरम्यान झालेले किस्से आणि आठवणी प्रेक्षकांना ऐकायला मिळतील आणि ते किस्से आणि त्या आठवणी प्रेक्षकांना नक्कीच आवडतील.

मराठी रंगभूमीवरील हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या सहभाग असलेला ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग १ जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ते अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेस देणार आहेत.

Back to top button