कुन्या राजाची गं तू रानी : अभिनेत्री शर्वरी जोग साकारणार गुंजा | पुढारी

कुन्या राजाची गं तू रानी : अभिनेत्री शर्वरी जोग साकारणार गुंजा

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवर १८ जुलैपासून सुरु होतेय नवी मालिका कुन्या राजाची गं तू रानी. डोंगरवाडी सारख्या छोट्याश्या खेडेगावात राहणाऱ्या मात्र मोठी स्वप्न पहाणाऱ्या गुंजाची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. गुंजा म्हणजे एक रानफळ. गुंजाचं झाड औषधी असतं, त्याचा पाला आपण गोड पानात खातो. गुंज्याची सगळी फळं वजनाला परफेक्ट एका भाराची असतात, म्हणून सोनं तोलत असताना ग्रामीण भागात आजही दोन गुंज, पाच गुंज सोनं असं म्हटलं जातं.

रानातल्या या मौल्यवान फळावरुनच गुंजाला गुंजा हे नाव पडलं. अभिनेत्री शर्वरी जोग या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मुळची कोल्हापूरची असणाऱ्या शर्वरीने वयाच्या ५ वर्षांपासूनच कथाकथन, बालनाट्यांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक एकांकिकांमध्ये तिने आपली छाप सोडली.

अभिनयाच्या याच वेडापायी शर्वरीने मुंबई गाठली आणि तिचा मालिका विश्वात प्रवेश झाला. गुंजा ही शर्वरीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा आहे. शर्वरीप्रमाणेच गुंजाचं ही स्वप्न आहे खूप शिकून आपल्या आईला शहरात घेऊन जायचं. याच स्वप्नांचा पाठलाग करत गुंजा आपलं ध्येय साधणार आहे.

गुंजा या भूमिकेबद्दल सांगताना शर्वरी जोग म्हणाली, ‘स्टार प्रवाहने दिलेली ही संधी माझ्या आयुष्याला नवी कलाटणी देणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारणार आहे. गुंजाबद्दल सांगायचं तर अतिशय खेळकर, निखळ आणि आत्मविश्वासू असं हे पात्र आहे. तिला शिकून खूप मोठं व्हायचं आहे. गुंजा डोंगरवाडीची भाषा बोलते. तिचे तिचे असे काही खास शब्द आहेत. मी मुळची कोल्हापूरची असल्याने गुंजाची भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. गुंजाचा लूकही वेगळा आहे. गुंजामुळे माझी पाण्याची आणि उंचीची भीती दूर पळाली. मी पाण्यातही शूट केलं आहे आणि ६० फूट उंच टाकीवरही. सायकल चालवायलाही नव्याने शिकले. त्यामुळे गुंजा या पात्राने मला खऱ्या अर्थाने समृद्ध केलंय असंच म्हणायला हवं.’

Back to top button