पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेमा 'घर बंदूक बिर्याणी'च्या जागतिक डिजिटल प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर हा मराठी सिनेमा जगभरातील प्रेक्षकांसाठी १९ मे २०२३ पासून पाहता येणार आहे. झी स्टुडिओज आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे यांची निर्मिती असलेल्या घर बंदूक बिर्याणी या सिनेमातून दिग्दर्शक हेमंत अवताडे यांनी पर्दापण केलं आहे. या सिनेमात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत.
घर बंदुक बिर्याणी हा सिनेमा बंडखोरांचं वर्चस्व असलेल्या कोलागडच्या काल्पनिक परिसरात घडतो. कमांडर पल्लम (सयाजी शिंदे) आणि त्यांचे बंडखोर जंगलात लपून तिथल्या आमदाराचा बदला घेण्याचा कट रचत असतात. जवळच्याच गावात राजू (आकाश ठोसर) त्याची भावी पत्नी लक्ष्मीला (सायली पाटील) भेटणार असतो. लग्नासाठी तिच्या वडिलांची एकच अट असते आणि ती म्हणजे, मुलाकडे स्वतःचं घर हवं. गावातल्याच एका ढाब्यावर काम करणाऱ्या राजूसाठी सगळ्यात चवदार बिर्याणी बनवणं एकवेळ सोपं असतं, पण घर घेणं तितकंच अवघड असतं.
या सगळ्यापासून दूर राया पाटील (नागराज मंजुळे) पुण्यात आपलं कर्तव्य इमानइतबारे करत असतो, पण त्याचमुळे तो अडचणीत येतो. त्याची बदली होते, ती थेट कोलागडमध्ये. एका क्षणी या तिघांचं आयुष्य समान बिंदूवर येतं. ते कसं याची गोष्ट घर बंदूक बिर्याणी या सिनेमात मनोरंजक आणि धमाल पद्धतीनं उलगडण्यात आली आहे.
दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे म्हणाले, 'घर बंदूक बिर्याणी माझ्यासाठी खूप खास आहे, कारण हा माझा पहिलाच सिन्मा आहे.'
नागराज मंजुळे म्हणाले, 'घर बंदूक बिर्याणीची मांडणी चाकोरी मोडणारी आहे, कारण आतापर्यंत अत्याचार, दडपशाही आणि प्रेमाची कथा कधीच तिरकस विनोद, अॅक्शन आणि नाट्यमय पद्धतीने मांडण्यात आलेली नव्हती. सर्व कलाकार व तंत्रज्ञांनी या सिनेमासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.'
सयाजी शिंदे म्हणाले, 'आतापर्यंत मी वेगवेगळ्या भाषांमधील सिनेमांत कितीतरी व्यक्तीरेखा साकारल्या, मात्र घर बंदूक बिर्याणीमधला पल्लम साकारणं सर्वात वेगळा अनुभव होता. कारण मुळात या व्यक्तीरेखेला वेगवेगळे पैलू आहेत. शिवाय, या सिनेमामुळे मला नागराजसारख्या गुणवान कलाकारासोबत काम करायला मिळालं. हेमंतनं आपल्या पहिल्याच सिनेमात कमाल केली आहे.'
आकाश ठोसर म्हणाले, 'घर बंदूक बिर्याणीची कथा विचारपूर्वक लिहिण्यात आली आहे आणि तितक्याच शैलीदार पद्धतीने मांडण्यात आली आहे. हा सिनेमा पहिल्या क्षणापासून आपल्याला त्यात असलेल्या व्यक्तीरेखांच्या आयुष्यात खेचून घेतो. या तीन व्यक्तीरेखांचं आयुष्य ज्या पद्धतीने एकत्र गुंफलं जातं, ते पाहण्यासारखं आहे.'