‘किंग खान’च ‘बादशाह’! TIME100 रीडर पोलमध्ये शाहरुख खान अव्वल स्थानी, लिओनेल मेस्सीला मागे टाकले | पुढारी

'किंग खान'च 'बादशाह'! TIME100 रीडर पोलमध्ये शाहरुख खान अव्वल स्थानी, लिओनेल मेस्सीला मागे टाकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे सुपरस्टार शाहरुख खान याने टाईम मासिकाच्या TIME100 यादीसाठी केलेल्या पोलमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. या पोलमध्ये १२ लाखांहून अधिक जणांनी आपले मत नोंदवले होते. त्यात शाहरुख खान ४ टक्के मतांसह सर्वाधिक प्रभा‍वशाली व्यक्ती ठरला आहे. विशेष म्हणजे शाहरुखने या यादीत अर्जेटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल (Duke and Duchess of Sussex Prince Harry and Meghan Markle) यांना मागे टाकले आहे. तसेच त्याने ऑस्कर विजेत्या अभिनेत्री मिशेल योह, टेनिस स्टार सेरेना विल्यम्स, फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्या वरचे स्थान पटकावले आहे.

या यादीत इराणच्या महसा अमिनी दुसऱ्या स्थानी आहेत. हिजाब परिधान न केल्याने इराणमधील पोलिसांच्या मारहाणीत २२ वर्षांच्या महसा अमिनी यांचा मृत्यू झाला होता. ही घटना गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणानंतर इराणमधील पोलिसांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यांना ३ टक्के मते मिळाली असून TIME च्या २०२२ च्या हिरोज ऑफ द इयर आणि गेल्या वर्षीच्या पर्सन ऑफ द इयर रीडर पोलमध्येही त्यांना स्थान मिळाले होते. (TIME100)

ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांना प्रत्येकी १.९ टक्के मते मिळाली आहेत. हे दोघेही चौथ्या स्थानी आहेत. तर दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १.८ टक्के मतांसह ५ व्या स्थानावर आहे.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुखच्या पठाण चित्रपटाने नुकताच बॉक्स ऑफिसवर धुमाकू‍ळ घातला. या चित्रपटाने जगभरात १ हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख अभिनयासह क्रिकेट जगतात चर्चेत असतो. तो कोलकाता नाईट रायडर्स IPL क्रिकेट संघाचा सह-मालक आहे.

शाहरुख लवकरच नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत जवान चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या डंकीमध्ये देखील काम करणार आहे. ज्यात तापसी पन्नू त्याची सहकलाकार आहे. हा चित्रपट या वर्षी रिलीज होणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button