Most Valued Celebrity 2022 : विराट कोहलीला पछाडत अभिनेता रणवीर सिंह ठरला सर्वाधिक ब्रँडव्हॅल्यू असणारा सेलिब्रिटी | पुढारी

Most Valued Celebrity 2022 : विराट कोहलीला पछाडत अभिनेता रणवीर सिंह ठरला सर्वाधिक ब्रँडव्हॅल्यू असणारा सेलिब्रिटी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कॉर्पोरेट इन्वेस्टीगेशन आणि रिस्क कंसल्टिंग फर्म क्रॉलच्या अहवालानुसार अभिनेता रणवीर सिंग हा २०२२ मधील भारतातील सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला (मौल्यवान) सेलिब्रिटी बनला आहे. “सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट २०२२ : बियोन्ड द मेनस्ट्रीम” या शीर्षकाच्या अहवालानुसार, रणवीर सिंगने १८१.७ मिलियन अमेरिकन डॉलर मूल्यासह क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकले आहे. (Most Valued Celebrity 2022)

विराट कोहली गेल्या पाच वर्षांपासून ब्रँड व्हॅल्यू सिलिब्रेटीमध्ये अव्वल स्थानी होता. आता विराट कोहली १७६.९ मिलियन अमेरिके डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये सलग दोन वर्षे घसरण होत आहे. २०२० मध्ये त्याची ब्रँड व्हॅल्यू २३७ मिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त होती, परंतु २०२१ मध्ये ती झपाट्याने घसरून १८५.७ मिलियन इतकी झाली. (Most Valued Celebrity 2022)

या यादीत अभिनेता अक्षय कुमार १५३.६ मिलियन डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासह तिसऱ्या स्थानावर आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, १०२.९ मिलियन डॉलर मुल्यांकनासह चौथ्या स्थानावर असून तिने सर्वात मौल्यवान महिला सेलिब्रिटीचे किताब आपल्याकडे कायम ठेवला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने 82.9 मिलियन डॉलर ब्रँड व्हॅल्यूएशनसह पाचवे स्थान पटाकावले आहे. (Most Valued Celebrity 2022)

अमिताभ बच्चन, हृतिक रोशन आणि शाहरुख खान ही फिल्म इंडस्ट्रीतील इतर काही मोठी नावे आहेत ज्यांनी सर्वात मौल्यवान सेलिब्रिटींच्या टॉप १० यादीत स्थान मिळवले आहे. माजी क्रिकेटपटू एमएस धोनी 80 मिलियन डॉलर पेक्षा जास्त ब्रँड मूल्यासह यादीत सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकरने २०२२ मध्ये टॉप – १० क्लबमध्ये प्रवेश करत ७३.६ मिलियन डॉलर ब्रँड मूल्यासह आठव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

२०२२ मध्ये टॉप २५ सेलिब्रिटींची एकूण ब्रँड व्हॅल्यू १.६ बिलियन डॉलर असण्याचा अंदाज आहे, जे २०२१ च्या तुलनेत अंदाजे २९.१ टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये प्रथमच, दक्षिण भारतीय कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंधाना यांनी भारतातील टॉप २५ मौल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळवले आहे. पीव्ही सिंधूसह नीरज चोप्रानेही टॉप २५ मध्ये स्थान मिळवले आहे.


अधिक वाचा :

Back to top button