पुढारी ऑनलाईन डेस्क : 'महाराष्ट्र शाहीर' या बहुचर्चित चित्रपटात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची भूमिका मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करत असल्याची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट २८ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
शाहीर साबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि राज्याभिमान जागविण्याचे काम केले. या कार्याच्या माध्यामतून ते अनेक जाज्वल्य प्रतिभा असलेल्या मान्यवरांच्या सानिध्यात आले.
साने गुरुजी, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, यशवंतराव चव्हाण ही त्यापैकीच काही नावे. शाहीर साबळे यांच्या जीवनावरील 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या निमित्ताने यातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत.
चित्रपटात लता मंगेशकर यांचीही व्यक्तिरेखा चित्रपटात असल्याचे कळते. ही व्यक्तिरेखा आघाडीची अभिनेत्री मृण्मयी देशपांडे साकारत असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे.
मृण्मयी देशपांडेने अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये आघाडीच्या भूमिका केलेल्या आहेत. हमने जिना सिख लिया, मोकळा श्वास, कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, फत्तेशिकस्त असे कित्येक चित्रपट तिने गेल्या १५ वर्षांमध्ये केले आहेत. त्याशिवाय अग्निहोत्र, कुंकू, सा रे ग म प अशा मालिका आणि टीव्ही शोसुद्धा तिने केले आहेत. मन फकीरा, मनाचे श्लोक या चित्रपटांचे दिग्दर्शन तिने केले आहे. एक गुणवान अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून तिची ओळख आहे.
'महाराष्ट्र शाहीर'ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे आहेत. या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे. चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. शाहिरांच्या प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि शाहीर साबळे आणि त्यांच्या पत्नी भानुमती यांच्यावरील एक प्रेमगीत नुकतेच प्रकाशित करण्यात आले. आघाडीचे लेखक गुरू ठाकूर यांनी ते लिहिले आहे.
'जय जय महाराष्ट्र माझा…' या गीताला राज्य गीताचा दर्जा देऊन राज्य शासनाने नुकताच हे गीत गाणाऱ्या शाहीर साबळे यांचा एकप्रकारे गौरव केला आहे. शाहिरांच्या जन्मशताब्दी वर्षाला सप्टेंबरमध्ये सुरुवात झाल्यापासून या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. यातील कलाकार, गायक आणि संगीतकारांनी गाण्यांसाठी घेतलेली मेहनत या सर्वच बाबी चर्चेत राहिल्या आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पोस्टर आणि प्रेम्गीताने या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीच ताणली गेली आहे.
'महाराष्ट्र शाहीर'शी अनेक रंजक आणि आश्चर्यकारक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. नातवाने आजोबांवरील म्हणजे केदार शिंदेने त्याचे आजोबा शाहीर साबळे यांच्यावरील चित्रपट दिग्दर्शित करण्याचा चित्रपटसृष्टीतील एक दुर्मिळ योग यात जुळून आला. या चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची आणि प्रख्यात कवयित्री भानुमती यांची भूमिका शाहिरांची पणती आणि केदार शिंदे यांची मुलगी सना केदार शिंदे साकार करत आहे! हा आणखी एक दुर्मिळ योगायोग आहे. या चित्रपटातील एक गाणे तर अजय-अतुल या संगीतकार जोडीने समाजमध्यामांवरून शोध घेतलेल्या एका शाळकरी मुलाकडून गाऊन घेतले आहे. या पार्श्वभूमीवर लता मंगेशकर यांची भूमिका मृण्मयी साकारणार असल्याचे समोर आल्याने चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.